मुंबईतील महिला डॉक्टर्स तणावाखाली; रुग्णालयांतील लाडक्या बहिणी असुरक्षित; मार्डचे आंदोलन तीव्र, रुग्णांचे हाल

कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्या घटनेबद्दल देशभरात प्रचंड संताप आहे. अनेक राज्यांमध्ये डॉक्टर्स संपावर गेले आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून त्यावर उद्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्यातच पद्म पुरस्कार विजेत्या 70 डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून कोलकाता पीडितेला न्याय द्या अशी मागणी केली आहे. या घटनाक्रमाचा मानसिक परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातील महिला डॉक्टरांवर झाला असून त्या तणावाखाली आहेत.

रुग्णालयात डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. देशभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून सुमारे पाच हजार निवासी डॉक्टर्स संपावर आहेत. महिला डॉक्टरांमध्ये तर प्रचंड भीती निर्माण झाली आहे. पालकांपासून दूर शिकण्यासाठी मुंबई व अन्य जिह्यांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींना वसतिगृहामध्ये तरी आपण सुरक्षित आहोत का, अशा विचाराने काटा येतो अशी परिस्थिती आहे.

संपूर्ण डॉक्टर समुदाय आपल्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर आक्रमक झाला आहे. पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रामध्ये विविध मुद्दय़ांचा उल्लेख करत या प्रकरणात पंतप्रधानांनी जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. डॉक्टर्स रात्रंदिवस काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असे नमूद करतानाच, कोलकाता प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या डॉक्टरांमध्ये दिल्लीतील एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. नरेश तेहान, डॉ. हर्ष महाजन, पहर्टिसचे संचालक अशोक सेठ, एम्सचे माजी संचालक डॉ. बलराम भार्गव आदींचा समावेश आहे.

पत्रातील मागण्या

महिला डॉक्टरचा लैंगिक छळ, बलात्कार किंवा तत्सम घटना घडली तर आरोपी कुणीही असो त्याला कठोर शिक्षा द्यावी.

वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या संस्थेची आहे.

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्यास जलदगतीने न्याय मिळावा तसेच त्याच्यावर हल्ला झाला तर आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी.

रेपिस्टना जागच्याजागी ठोका – डॉ. जलिल परकार

कोलकाता पीडितेला न्याय देण्यासाठी या घटनेची अगदी खोलवर चौकशी करा, पण कारवाई करत बसू नका. केस चालणार, जामीन मिळणार हे सर्वांना माहीत आहे. रेपिस्ट सापडल्यावर जागच्या जागी ठोका, तरच त्यांना वचक बसेल, असे स्पष्ट मत लीलावती रुग्णालयाचे ज्येष्ठ श्वसनविकारतज्ञ डॉ. जलिल परकार यांनी व्यक्त केले. डॉ. परकार यांनी एपंदरीतच डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, रुग्णालयांकडून डॉक्टरला डिस्पोजेबल कमॉडिटीसारखे पाहिजे तसे वापरले जाते आणि नंतर फेकून दिले जाते. रुग्णांना चांगले उपचार देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, पण रुग्णाच्या मनाप्रमाणे झाले नाही तर डॉक्टरला शिव्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, असे सांगताना, अगदी आयसीयूमध्ये घुसूनही मारहाण केली जाते असा अनुभवही डॉ. परकार यांनी सांगितला. डॉक्टरांवर हल्ला झाला तर रुग्णालयाचे व्यवस्थापन कधीच वाचवत नाही. सुरक्षारक्षकही वाचवत नाहीत. खासगी रुग्णालयांची सुरक्षाही निव्वळ दिखावा आहे. वेळेला डॉक्टरांसाठी कुणीच उभा राहत नाही. जमाव आला तर काय करणार, असा सवालही डॉ. परकार यांनी केला.

दुर्दैवाने डॉक्टरांमध्ये एकी नाही

कोलकात्यातील घटनेने आपले लक्ष वेधले. कारण देशातील डॉक्टरांनी आंदोलने केली. पण डॉक्टरांवर हल्ले, मारहाण अशा घटना घडतच असतात. पण त्यातील बऱ्याचशा बाहेर येत नाहीत. केवळ डॉक्टर म्हणून नाही तर महिलांच्या सुरक्षेत तडजोड केलीच जाऊ शकत नाही. डॉक्टरांमध्ये दुर्दैवाने एकी नाही. अॅलोपथी, होमियोपथी, आयुर्वेद अशा सर्वच क्षेत्रातील डॉक्टर संघटनांनी एकत्र येऊन या मुद्दय़ावर विचार केला पाहिजे. नाईट डय़ुटीला तर रुग्णालयांमधील सुरक्षेत ढिलाईच असते. सुरक्षारक्षक डुलक्या घेत असतात.

– डॉ. कृष्णकांत डेबरी (जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन)

सीसीटीव्ही लावलेत पण चालू किती आहेत, मॉनिटरींग कोण करतोय

महिला डॉक्टरांना रात्री अपरात्रीही रुग्ण तपासणीसाठी जावेच लागते. कारण डॉक्टरमध्ये महिला-पुरूष भेद करता येत नाही. कडक कायदा नसल्याने गुन्हेगारांची भीती मेली आहे. रुग्णालयात सीसीटीव्ही किती आहेत हे महत्वाचे नाहीत ते चालू आहेत का. असतील तर त्यांचे मॉनिटरींगही व्हायला हवे. सुरक्षारक्षक पंट्रोल रुममधून ती करतात का हेसुद्धा बघायला हवे. मुख्य म्हणजे रुग्णालयात जमावाला प्रवेश करण्यास मनाई केली पाहिजे. टीव्हीवर फक्त राजकारण दाखवताहेत पण आठ दिवस निवासी डॉक्टर संपावर गेलेत त्याचे कुणालाच काही पडलेले नाही.

– डॉ. नीलम साठे (केईएम रुग्णालय)

संवेदनशील ठिकाणी जास्त सुरक्षा ठेवा

महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणे ही घटना गंभीर आणि तितकीच निषेधार्ह आहे. आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे.  महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने पावले उचलायला हवीत. प्रत्येक डॉक्टरमागे सुरक्षारक्षक नेमा अशी कुणाची मागणी नाही पण रुग्णालयातील संवेदनशील ठिकाणी जास्त सुरक्षा ठेवायला हवी.

– डॉ. दिनेश धोडी  (सचिव – महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना)

डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्टची अंमलबजावणीच नाही

 महाराष्ट्रात डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही. महिला डॉक्टरवर बलात्कार होण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. आता चौकशी सुरू आहे, सर्वोच्च न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनीही आता विचार करायला हवा. काळ्या फिती लावून निषेध करा पण संपामुळे गरीब रुग्णांना त्रास होईल याचीही काळजी घ्या. कोलकात्यातील घटनेचा संबंध रुग्णाशी नव्हता हे लक्षात घ्यायला हवे.

– डॉ. अनिल दुधभाते (माजी अध्यक्ष, मार्ड)

अनेकदा आम्ही रात्रीच्या वेळी त्या मार्गाने जाताना सुरक्षारक्षक सोबत घेऊन जातो. पण त्यांचीही संख्या पुरेशी नसल्याने सुरक्षारक्षक त्यांना दिलेला पॉइंट सोडून जाण्यास तयार होत नाहीत, असे एका महिला निवासी डॉक्टरने सांगितले.

वसतिगृहातून रुग्णालयात जाताना भीती वाटते

निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आणि रुग्णालयाची मुख्य इमारत यादरम्यानचे रस्ते रात्री सुनसान असतात. तिथे सुरक्षारक्षकही नसतात. सुरक्षारक्षक वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर आणि पुढे रुग्णालयाच्या अगदी आतमध्ये असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी तिथून ये-जा करण्यास भीती वाटते. कोलकात्याच्या घटनेनंतर तर ती भीती अधिकच वाढली असल्याचे मुंबईतील केईएम, नायर, शीव आणि सर जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या महिला निवासी डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.