
मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलमध्ये फेरीवाल्यांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला रेल्वे प्रशासनाने ‘एण्ट्री पास’ दिल्याचे सांगून फेरीवाले एसी लोकलमध्ये शिरकाव करीत आहेत. यावर महिला प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. फेरीवाले दादागिरी करीत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नॉन-एसी लोकलमध्ये फेरीवाल्यांचा उपद्रव डोकेदुखीचा मुद्दा बनला आहे. फेरीवाले महिलांच्या डब्यात दिवसा-रात्री कधीही प्रवेश करतात. त्यांना राखीव डब्यात मुभा देण्यावर प्रवाशांचा विरोध आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी होत असताना आता एसी लोकलच्या प्रवाशांपुढे फेरीवाल्यांची समस्या उभी राहिली आहे. बुधवारी एका एसी लोकलमधील फेरीवाल्याकडे ‘एण्ट्री पास’ आढळून आला. संबंधित पास रेल्वेकडूनच देण्यात आल्याचे फेरीवाल्याने सांगितले. ही धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी दिली.


























































