
कर्णधार राधा यादवच्या अष्टपैलू वादळाने श्रीलंका ‘अ’ संघाचा चक्काचूर करत हिंदुस्थानच्या युवा महिला संघाने ‘महिला रायझिंग स्टार्स टी-20 आशिया कप’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाच विकेट राखून मिळवलेला हा विजय म्हणजे केवळ यश नाही, तर प्रतिस्पर्ध्यांना दिलेला इशाराच ठरला. आता जेतेपदाचा महासंग्राम रविवारी बांगलादेशविरुद्ध खेळला जाईल.
नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करणाऱया श्रीलंकेचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना अक्षरशः गुंडाळले. श्रीलंकेचा डाव अवघ्या 118 धावांत आटोपला. राधा यादव हिने 19 धावांत 4 विकेट घेत लंकेची पंबर मोडली. डावखुरी फिरकी गोलंदाज तनुजा पंवरने 20 धावांत 2 तर प्रेमा रावतने 9 धावांत 2 विकेट घेत प्रभावी साथ दिली. श्रीलंकेकडून संजना कविंदीने 31 धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतरांचा हिंदुस्थानी फिरकीसमोर टिकाव लागला नाही. 10 षटकांत 2 बाद 71 अशा भक्कम स्थिती असतानाही श्रीलंकेचा डाव अचानक कोसळला.


























































