मेगान शटने 17 व्या षटकांत केलेला मारा हिंदुस्थानसाठी खतरा ठरला. तिने एक धाव देत रिचा घोषच्या काढलेल्या विकेटने हिंदुस्थानला विजयापासून दूर नेले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने झुंजार आणि संघर्षपूर्ण फलंदाजी करत हिंदुस्थानला विजयासमीप आणले. पण अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियासमोर 9 धावांनी हार सहन करावी लागली. जगज्जेती ऑस्ट्रेलिया साखळीत सलग चारही सामने जिंकत अव्वल राहिली. आता आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचे हिंदुस्थानचे भवितव्य न्यूझीलंड-पाकिस्तान या लढतीच्या निकालावर ठरेल. स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांच्या विकेट काढणारी सोफी मोलिनिक्स ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.
हिंदुस्थानसमोर उपांत्य फेरीतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक होता. ऑस्ट्रेलियाच्या 152 धावांचा पाठलाग करताना शेफाली वमनि घणाघाती सलामी दिली. 13 चेंडूंत 20 तडकावल्यानंतर स्मृती मानधना (6) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (16) बाद झाल्यामुळे हिंदुस्थानचा डाव संकटात सापडला. त्यामुळे हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माने सावध पण चांगला खेळ करत संघाला विजयपथावर ठेवले.
दोघींनी चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाचे हृदयाचे ठोके वाढवले. पण ही जोडी फुटताच हिंदुस्थानच्या पायाखालची वाळूच सरकली. 24 चेंडूंत 41 धावांची गरज होती, पण मेगान शटने दुसऱ्याच चेंडूवर रिचा घोषला बाद केले आणि पुढील तिन्ही चेंडू हरमनला निर्धाव खेळायला भाग पाडले. शेवटच्या चेंडूवर हरमनने षटकातील पहिली धाव काढली. त्यामुळे हिंदुस्थानचे लक्ष्य 18 चेंडूंत 40 धावा असे आणखी आव्हानात्मक झाले. तेव्हा हरमनने पुढील दोन षटकांत चार चौकार खेचत 26 धावा वसूल केल्या. ह
रमनच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या 6 चेंडूंवर 14 धावांची आवश्यकता होती. हरमनच्या हातात स्ट्राईक होती; पण सदरलॅण्डने हरमनला केवळ एकच घाव काढू दिली आणि सामनाही हिंदुस्थानच्या हातून काढून घेतला. प्रत्येक चेंडूवर चौकार फटकावण्याच्या प्रयत्नात हिंदुस्थानला धक्के बसत गेले. हरमनप्रीतकडे स्ट्राईक आली, पण सदरलॅण्डच्या प्रभावी माऱ्यापुढे ती मोठा फटका मारण्यात अपयशी ठरली. परिणामतः 14 धावांच्या प्रयत्नात हिंदुस्थानने 4 विकेट गमावत केवळ 4 धावाच काढल्या. हरमनप्रीत 54 धावांवर नाबाद राहिली.
रेणुकाचा दणका
रेणुका सिंगने आपल्या दुसऱ्याच षटकांत सलग चेंडूवर बेथ मूनी आणि जॉर्जिया वे अरहॅमचा विकेट घेत ऑस्ट्रेलियन डावाला हादरवले. रेणुकाच्या या दणक्यानंतर ऑस्ट्रेलियन डाव कोसळण्याऐवजी सावरत गेला. ग्रेस हॅरिस (40) आणि कर्णधार ताहिला मॅकग्रा (32) हिने 52 धावांची भागी रचत संघाला सुस्थितीत आणले. ताहिलानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या; पण त्यांच्या धावांचा ओघ काही कमी झाला नाही. एलिस पेरीने 23 चेंडूंत 32 धावांची घणाघाती खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. फिबी लिचफिल्ड हिने 9 चेंडूंत 15 आणि अॅनाबेल सदरलॅण्ड हिने 6 चेंडूंत 10 धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलिया दीडशतकी मजल मारू शकली. फिबी हिने श्रेयंका पाटीलच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत संघाला 151 धावांवर पोहोचवले. रेणुकाने 24 धावांत, तर दीप्ती शमनि 28 धावांत 2-2 विकेट टिपल्या.