महिला बचत गटांना काळ्या यादीत टाकण्याचा महापालिकेचा निर्णय रद्द, आदित्य ठाकरे यांचे महिलावर्गाकडून आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या शालेय पोषण आहार योजनेत पोषण आहार पुरवठा करणार्‍या 243 महिला बचतगट, संस्था व मंडळे यांच्यावर चुकीचा ठपका ठेवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय महानगरपालिकेने आज रद्द केला. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात महापौरांशी संपर्क साधल्यामुळे हे शक्य झाले. आदित्य ठाकरे यांनी संपर्क साधल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हा निर्णय रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर पश्चिम उपनगरे महिला सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षा संजना घाडी यांच्या नेतृत्वाखाली 243 महिला प्रतिनिधींनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महिलांच्या आणखी काही समस्या असतील तर त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन, असे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

याप्रसंगी मुंबै बँकेच्या संचालिका शिल्पा सरपोतदार, फेडरेशनच्या स्नेहा कदम, उषा जांगळी, स्नेहप्रभा चव्हाण, शालिनी गायकवाड, ममता हातिसकर, मेधा सुर्वे, रश्मी भांबरडेकर, यशोदा सकपाळ गावडे, दीपिका सहानी, शुभदा शिंदे आदी उपस्थित होत्या.