आजारी महिलांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्या, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती

369

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती, रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधीत आजार तसेच हृदयविकार, श्वसनविकाराचा त्रास असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱयांना मानवतेच्या दृष्टीकोनातून घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने यशोमती ठाकुर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कोरोना संकट काळात महिला सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱयांना भेडसावत असलेल्या अडचणीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन स्वतःस तसेच बाळाला धोका पोहचू नये म्हणून अनेक गर्भवती महिला अधिकारी- कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस आणि श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गातून धोकादायक स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱयांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी; खूपच अत्याकश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करु देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा,असे यशोमती ठाकुर यांनी पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या