सीएसएमटी-पनवेल एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉरला गती मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बहुप्रलंबित सीएसएमटी ते पनवेल या 47 कि.मी.च्या एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉरला गती मिळणार आहे. या कॉरिडॉरसाठी लवकरच नेरुळ तसेच तुर्भे परिसरात जमिनीची संयुक्त मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव ठाणे भूसंपादन विभागाने भूमी अभिलेखकडे पाठविला आहे. या मोजणीसाठी साधारण दोन महिने लागणार आहेत. त्यानंतर ‘जीपीएस’ तंत्राआधारे जमिनीचे आरेखन सुरू होऊन जमीन संपादनाची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

साल 2009-10च्या रेल्वे अर्थसंकल्पात 12,331 कोटींच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्तावावर नुसतीच चर्चा होत होती. 2012 साली या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल तयार करण्यात आला. सध्याच्या हार्बर मार्गाच्या शेजारून हा उन्नत स्वरूपातील मार्ग जाणार असून त्यासाठी ठाणे खाडीवर 4.3 कि.मी.च्या पुलाची उभारणीही करावी लागणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-3 एमध्ये या प्रकल्पाचा समावेश केला आहे. 2018च्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-3 एला मंजुरी देण्यात आली. आता नियमानुसार राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच रेल्वे बोर्ड, नीती आयोग व त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.

किती जमीन जाणार ते कळणार
हा मार्ग नेरुळ तसेच तुर्भेतून जाणार आहे. येथील जमिनींची माहिती व त्याचे मूल्यांकन सुरू होणार आहे. त्यासाठी संयुक्त मोजणीचा प्रस्ताव भूमी अभिलेखाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पात किती जणांची जमीन जाणार, त्यात झाडे किती, खासगी व सरकारी जमीन किती आदी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. संयुक्त मोजणीला सुरुवात होताच त्यासाठी दोन महिने तरी लागतील. जमिनींचे मूल्यांकन होईल आणि ज्यांची जमीन प्रकल्पात आहे त्यांच्याशी चर्चाही केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांचा अर्धा तास वाचणार
सीएसमटी ते पनवेल मार्गावरील प्रवासाला हार्बर मार्गाने आता 77 मिनिटे लागतात. मात्र या उन्नत मार्गामुळे या प्रवासासाठी 45 मिनिटे लागणार असून त्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार आहे. वाशीपर्यंत हा मार्ग हार्बरच्या समांतर जाणार असून पुढे पामबीच मार्गे पुन्हा बेलापूरनंतर पनवेलपर्यंत हार्बर मार्गाच्या बाजूने हा मार्ग जाणार आहे.

एकूण 11 स्थानके असणार
सीएसमटी ते पनवेल मार्गावर सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, टिळक नगर, चेंबूर, मानखुर्द, वाशी, नेरूळ, सीबीडी बेलापूर, खारघर, पनवेल ही स्थानके असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही उन्नत मार्ग जोडला जाणार आहे.

summary- work started csmt to panvel elevated route