जेएसडब्ल्यु कंपनीत भाजून कामगाराचा मृत्यु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पेण तालुक्यांतील डोलवी गावच्या हद्दीत असणां-या जेएसडब्लू स्टील कंपनीतील एस.एम.एस प्लाँटमध्ये काम करताना भाजून विश्वनाथ शिवनाथ गावंड याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शुक्रवारी विश्वनाथ गावंड हे जेएसडब्ल्यु कंपनीत काम करत असताना अचानक एक जळता स्लॅग त्यांच्या अंगावर पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची खबर मिळताच बोरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत विश्वनाथ गावंड हा बोरी गावात रहात असून नुकतेच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याच्या आकस्मित जाण्यामुळे बोरी गाव व परिसरावर दु:खाची छाया पसरली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जेएसडब्ल्यु कंपनीचे दोन्ही गेट बंद केल्याने कंपनी परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. पोलीस उपविभागीय अधिक्षक नितीन जाधव, वडखळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर वडखळ पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.