पगारवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; नोएडामध्ये दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील फेज-2 परिसरामध्ये पगाववाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतले. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत काही वाहने पेटवून दिली आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.

सकाळी लवकर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दिल्ली आणि नोएडाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर विशेषतः NH 9 वर मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आणि अनेक प्रवासी तासनतास अडकून पडले होते.

नोएडातील फेज-2 आणि सेक्टर-84 परिसरात गेल्या तीन दिवसांपासून कर्मचारी शांततेत आंदोलन करत होते. मात्र, सोमवारी सकाळी मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून कर्मचारी आक्रमक झाले. शेकडो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात आंदोलकांनी सेक्टर-84 परिसरात दोन वाहनांना आग लावली, तर पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत त्यांचे नुकसान केले.

वाढती महागाई पाहता सध्याचा पगार उदरनिर्वाहासाठी पुरेसा नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. आम्ही दीर्घकाळापासून वेतनवाढ आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधांची मागणी करत आहोत, परंतु व्यवस्थापनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, असे एका आंदोलकाने सांगितले.

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, ती सकाळी साडे सात वाजता घरातून निघाली होती, पण तासभर एकाच ठिकाणी अडकून पडली. वाहतूक अजिबात हलत नाहीये. लोक गाड्यांतून खाली उतरून पुढे काय चालले आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही तिने सांगितले.