पुस्तकांच्या घरात तुमचं स्वागत! सोलापूरच्या काशीनाथ भतगुणकी यांच्याकडे सात हजार पुस्तकांचा संग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘होय, ग्रंथ हीच आमची संपत्ती आहे. घर घेण्यासाठी पैसे नाही, पण पुस्तकांसाठी एक घर घेतलंय…’ असं म्हणतात सोलापूरचे संगीता आणी काशीनाथ भतगुणकी हे जोडपं. सध्या लॉकडाऊन लागलाय, रोजच्या धावपळीतून वेळ मिळालाय तर आपल्याकडे किती पुस्तके आहेत त्याची मोजणी नुकतीच भतगुणकी दांपत्याने केली. ही पुस्तके थोडीथोडकी नसून तब्बल सात हजार असल्याचे त्यांना आढळून आले. या सर्व पुस्तकांची किंमत अंदाजे 19 लाख रुपये तरी आहे. काशीनाथ भतगुणकी यांनी आपल्या पुस्तकांच्या घराचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या पुस्तकप्रेमावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काशीनाथ भतगुणकी हे दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल या गावात राहतात. त्यांचे एमएसडब्ल्यू बीएडपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांना लहानपणापासून पुस्तक वाचनाची आवड आहे. इयत्ता दहावीत असल्यापासून रोज पुस्तक विकत घेऊन वाचायची सवय त्यांना लागली. मागील 18 वर्षांत त्यांनी सुमारे सात हजारांपेक्षा जास्त पुस्तके जमवली आहेत. यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, आध्यात्मिक, स्पर्धा परीक्षा, यशस्वी लोकांचे अनुभव कथन, अनुवादित, प्रेरणादायी पुस्तके आदींचा समावेश आहे.

काशीनाथ भतगुणकी आपल्या ड्रीम फाऊंडेशन या संस्थेमार्फत मुलांना, मोठय़ांना ही पुस्तके मोफत वाचायला देतात. बरेच जण पुस्तके परत आणून देतात, मात्र काही जण गहाळ करतात याची खंत भतगुणकी व्यक्त करतात. पाच ठिकाणी ते अभ्यासिका चालवतात. ड्रीम फाऊंडेशनतर्फे पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित केली जाते. तसेच मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व वक्ता प्रशिक्षण, अखंड 18 तास अभ्यास अभिवादन असे उपक्रम राबवले जातात. ‘मी यशस्वी होणार’ हा प्रेरणादायी कार्यक्रम भतगुणकी सादर करतात. या कार्यक्रमात मुलांना प्रश्न विचारून तीन-तीन पुस्तके भेट दिली जातात. नव्या पिढीत वाचनसंस्कृती वाढण्याचा त्यांना प्रयत्न आहे.