जागतिकदृष्ट्या नामशेष प्रजातीचे गिधाड बीड जिल्ह्यात आढळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनॅशनल युनियन फॉर कनझर्वेश ऑफ नेचर (आययुसीएन)च्या लाल यादीत अतिशय चिंताजनक या वर्गात येणाऱ्या जिप्स प्रजातीच्या गिधाडांची संख्या जगभरातून 99.7 टक्यांनी कमी झाली असतांना, बीडमध्ये या प्रजातीचे भारतीय गिधाड आढळून आले आहे. या गिधाडांची शुश्रुषा सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात करण्यात येत आहे. त्यास लवकरच निसर्गात सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग यांनी दिली.

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले जैवसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे भारतीय गिधाड /लांब चोचीचे गिधाड हे नुकतेच बीड जिल्ह्यातील खामगाव येथिल माळरानावर घायाळ अवस्थेत गुराख्यांना दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी या गिधाडांची माहिती तत्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर ताबडतोब वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे, वनपाल दिनेश मोरे, वनरक्षक बळीराम यादव, राजेंद्र कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन त्या गिधाडास आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रहाडकर यांच्याकडून उपचार करून घेतले. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग याच्या मार्गदर्शनाखाली तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर सामाजिक वन विभागाचे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी सर्पराज्ञीस भेट देऊन या गिधाडांची पाहणी केली. सध्या गिधाडांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यास लवकरच निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांनी दिली.

गिधाडांचे वैशिष्ट्य
गिधाड हे मृतभक्षक वर्गातील पक्षी ते प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात.
33 हजार फुटापेक्षा वर उंच आकाशात भरारी घेतो. ही भरारी एव्हरेस्टच्या उंचीच्या वर.
नजर अतिशय तीक्ष्ण असते.
थव्याने प्रवास करतात.
एकावेळी एक किंवा दोन अंडी देतात. वर्षातून एकदाच प्रजनन करतात.
घरट्याची जागा पिढ्यानपिढ्या वापरल्या जातात.

जैवसाखळीतील महत्वाचा दुवा असलेल्या या पर्यावरण रक्षक पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी वनविभाग,वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सेंच्युरी असोसिएशन व सर्पराज्ञी प्रकल्प मिळून आम्ही बीडजिल्ह्यातील गिधाडांच्या आस्तित्वाची शोध मोहीम हाती घेतली आहे.
– मधुकर तेलंग (विभागीय वन अधिकारी- बीड)

एकेकाळी सर्वत्र आढळणारे गिधाडे हे 2002 पासून आययुसीएनच्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून सुचिबद्ध केले गेले आहे.भारतात गिधाडांचे अस्तित्व तर केवळ 1 टक्का इतकेच शिल्लक राहिले आहे.त्या मुळे त्यांचे संरक्षण संवर्धन करणे आवश्यक आहे.
– सिद्धार्थ सोनवणे (वन्यजीव अभ्यासक) (संचालक: सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)