WTC IND vs NZ पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाल्यास पुढे काय? वाचा ICC चा नियम

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या लढतीचा रोमांच पाहायला क्रीडा रसिकांना आणखी थोडी वाट पाहायला लागू शकते. कारण इंग्लंडमध्ये जिथे हा सामना रंगणार आहे तिथे पावसाने खेळ सुरू केल्याने पहिले सत्र वाया गेले आहे. हिंदुस्थानच्या वेळेनुसार हा सामना दुपारी 3 वाजता सुरू होणार होता, मात्र पावसाने बॅटिंग सुरू केल्याने मैदान ओले झाले. त्यामुळे बीसीसीआयने ट्विट करत पहिले सत्र वाया गेल्याचे सांगितले.

संपूर्ण जगातील क्रीडा प्रेमींचे लक्ष हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या लढतीवर आहे. परंतु साऊथहॅम्पटन येथे रात्रीपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने देखील या लढतीवर पावसाचे सावट असेल असा अंदाज वर्तवला होता आणि ही भीती खरी ठरताना दिसत आहे. येथे पाचही दिवस हवेतील आद्रता 95 टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पाचही दिवस पावसाची शक्यता असल्याने क्रीडा प्रेमी निराश झाले आहेत.

एक अतिरिक्त दिवस

इंग्लंडमध्ये वर्षभर हवामान पावसाचे असते. पाऊस आणि ऊन यांचा खेळ सुरूच असतो. त्यामुळे आयसीसीने देखील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीसाठी एक दिवस अतिरिक्त ठेवला आहे. परंतु हवामान विभागाने पाचही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाचही दिवस पाऊस पडल्यास अतिरिक्त दिवशी सामना पूर्ण केला जाईल.

WTC IND vs NZ फायनलपूर्वी विराट कोहलीचे आश्चर्यचकित करणारे विधान, म्हणाला; 5 दिवसाच्या लढतीवरून…

…तर दोन्ही संघ विजयी

दरम्यान, आयसीसीच्या नियमानुसार एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाला संयुक्तपणे विजयी घोषित केले जाईल. याआधी 2002 ला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत हिंदुस्थान आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. 29 आणि 30 सप्टेंबर दरम्यान झालेल्या या लढतीत श्रीलंकेची बॅटिंग झाल्यावर दोन्ही वेळेस पाऊस झाला. त्यामुळे हिंदुस्थानला 50 ओव्हर खेळायला मिळाल्या नाही. त्यानंतर आयसीसीने दोन्ही संघाला संयुक्तपणे विजयी घोषित केले गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या