जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने.. महाराष्ट्र व्याघ्र राजधानी होण्याच्या मार्गावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी 

जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने.. महाराष्ट्र व्याघ्र राजधानी होण्याच्या मार्गावर!
रुबाबदार.. अति उग्र.. पण नितांत देखणे सौंदर्य.. उग्र असूनही चेहऱ्यावर भारदस्त आणि विलक्षण सभ्य भाव.. कोणाच्या अध्यात ना मध्यात.. मनुष्य प्राण्याकडे तर ढुंकूनही पाहणार नाही.. ना भूक लागल्याशिवाय इतर कोणत्या प्राण्याकडे.. वाघ.. आणि वाघीण.. आपसातही दोघांची कार्यक्षेत्र वेगवेगळी.. वाघावर कोणतीही कुटुंबाची जबाबदारी नाही.. त्याचा स्वैर संचार.. स्वत:च्या हद्दीबाहेरही वर्चस्व स्थापन करण्याची सफल होणारी महत्वाकांक्षा.. वाघिणीवर तिच्या पिलांची पूर्ण जबाबदारी.. आपली पिले दोन वर्षांची होईपर्यंत ती त्यांचे पालन पोषण करते.. त्यांना शिकारीचे धडे देते.. आणि यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागतो.. अगदी शिकारीसाठीसुद्धा.. त्यातला त्यात माणसाशी संघर्ष तर नेहमीच माणसाकडून ऐरणीवर आलेला..
२०१० पासून जगभरात २९जुलै हा व्याघ्रदिन म्हणून पाळला जातो. आपल्याकडे वाघ हा संरक्षित प्राणी आहे. एकेकाळी पश्चिमेस पूर्व अंटोलिया ते अमूर नदी पात्र.. आणि दक्षिणेस हिमालयाच्या पायथ्यापासून सुली बेटाच्या बालीपर्यंत सर्वत्र वाघ पसरले होते.. वाघांचे खरे माहेरघर म्हणजे आपला देश. एकेकाळी आपल्याकडे वाघांची लोकसंख्या ९३% होती.. पण सततच्या शिकारी, मानवी अतिक्रमणे, अन्नपाण्याचा अभाव यातून वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर येत होता. यातून सावरून अजूनही आपल्या देशात ७०% वाघ आहेत. ही संख्या २०२० ची आहे. हिंदुस्थानात २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. चार वर्षांनी ही संख्या वाढून २९६७ वर पोहोचली. आज आपल्याकडे वाघांची संख्या सर्वाधिक असली तरी अजूनही वाघांची संख्या चिंताजनक आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, झारखंड, राजस्थान, ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ,छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, चेन्नई, बिहार, मिझोरम, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, उत्तरांचल अशा १९ राज्यांमध्ये वाघांचे अस्तित्व आढळते. व्याघ्र गणना करताना पूर्ण वाढ झालेले वाघच गणनेत धरले जातात. दर चार वर्षांनी ही गणना केली जाते. चार वर्षांपूर्वी २५० बच्चे आढळून आले होते. म्हणजे आजमितीला ते तरुण झाले असणार. वेगवेगळ्या कारणांनी बछड्यांचे जगण्याचे प्रमाण ३० ते ४०% एवढेच असते. शिवाय इतर राज्यातून महाराष्ट्रात वाघ स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपण व्याघ्र राजधानी होण्याच्या मार्गावर आहोत असे म्हणायला हरकत नाही.
*वाघात नर मादी वजनात खूपच फरक असतो. नर वाघाचे वजन ९० पासून ३०० किलो पर्यंत असते.
* बंगाल टायगरचे वजन ३५० किलोच्या आसपास असते.
*वाघ साधारणत: माणसांपासून , इतर प्राण्यापासून लांब राहणे पसंत करतो. जास्त करून दलदल, झाडाझुडपांमध्ये त्याची वसती असते. तो रात्रीच्या अंधारात शिकार करतो.
* वाघाचे मागचे पाय पुढील पायांच्या तुलनेत लांब असतात. या पायांच्या मदतीनेच वाघ वेगाने पळतो किंवा लांब उडी घेऊ शकतो.
* वाघ एका रात्रीत २७ किलोपर्यंत मांस खाऊ शकतो. शिकार करण्यासाठी त्याला २० वेळा प्रयत्न करावे लागतात.
* एरव्ही एकांतवास प्रिय असणारा वाघ उन्हाळ्याच्या दिवसात मात्र पाण्याच्या शोधात लांबवर जातो.
*जगातील सर्वात मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या यादीत वाघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर ध्रुवीय अस्वल, दुसऱ्या क्रमांकावर भुरे अस्वल आहे.
* वाघाची डरकाळी ३ किलोमीटर दुरूनही ऐकली जाऊ शकते.
*त्याची उडी ८ मीटर दूर तर ५ मीटर उंच जाऊ शकते. पळण्याची क्षमता ६० किलोमीटर प्रतितास. वाघ ६ किलोमीटरपर्यंत पोहू शकतो.
*वाघाचे वरचे दात दहा सेंटीमिटर म्हणजे मानवी बोटाइतके लांब असतात.
*वाघाचे आयुष्य २० ते २५ वर्षं असते. पण मानसिक ताणताणावामुळे त्याचे सरासरी १० वर्षापुरतेच मर्यादित होते.