
जगभरात सर्वाधिक मृत्यू हृदयरोगामुळे होतात. गेली 20 वर्षे हृदयरोग हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. 20 वर्षांत 20 लाख मृत्यू हृदयरोगाने झाले आहेत. मधुमेह आणि डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) या आजारांनीही सर्वाधिक बळी घेतले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने 2000 ते 2019 दरम्यानची जागतिक आरोग्य आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झालेल्या आजारांची नावे सांगितली आहे. ज्या 10 आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू झालेत, त्यापैकी सात आजार संसर्गजन्य नाहीत.
हृदयाच्या आजाराने 16 टक्के मृत्यू
गेल्या 20 वर्षांचे आकडे फारच धक्कादायक आहेत. जगातील एकूण मृत्यूंपैकी 16 टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होत आहेत. 2000 सालापासून 20 लाखांहून अधिक मृत्यू हृदयरोगाने झाले आहेत.
- 2019 मध्ये एचआयव्ही/एड्समुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत.
- टीबीचा समावेश जगातील 10 मोठय़ा आजारांमध्ये नाही. 2000 मध्ये टीबी हा मोठय़ा आजारांमध्ये सातव्या स्थानावर होता. तो 2019 साली 19 व्या स्थानावर आलाय.
- मधुमेह आणि डिमेन्शियामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत.
अल्झायमर्स आणि डिमेन्शियाचे अन्य प्रकार धोकादायक ठरत असून अमेरिका आणि युरोपमध्ये ते मृत्यूच्या कारणांमध्ये तिसऱया क्रमांकावर आहेत. अल्झायमर आणि अन्य प्रकारच्या डिमेन्शियामुळे मरण पावणाऱयांमध्ये तब्बल 65 टक्के महिलांचा समावेश आहे.

























































