मिहीर शहाच्या रक्तात अल्कोहोलचा अंश नाही! तीन दिवसांनी नमुने घेतल्याने अहवाल वेगळा

वरळी येथे कावेरी नाखवा यांच्या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याच्या रक्ताचा अहवाल आला आहे. अपघाताच्या तीन दिवसांनंतर रक्ताचे नमुने घेतले गेल्याने मिहीरच्या रक्ताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्या रक्तात अल्कोहोलचा अंश नसल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

7 जुलैच्या पहाटे कावेरी व प्रदीप नाखवा हे दाम्पत्य दुचाकीवरून क्रॉफर्ड मार्पेटहून वरळीच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी वरळीच्या लँडमार्क जीप शोरूमसमोर वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. कावेरी नाखवा या कारच्या बंपर व इंजिनच्या मध्ये अडकल्या. एवढे होऊनही कारचालक मिहीरने कावेरी यांना दोन किमी फरफटत नेले. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीएमडब्ल्यू कारचालकाने पळ काढला होता. मात्र वरळी पोलिसांनी केलेल्या तपासात चालक मिहीरने दारू पिऊन हा अपघात केल्याचे समोर आले. दरम्यान, घटनेच्या तीन दिवसांनंतर मिहीरला पकडण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता. त्यावेळी त्याचे रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आला असून त्यात मिहीरच्या रक्तात अल्कोहोलचा अंश नसल्याचे आढळून आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

z मिहीरने दारू पिऊनच हा अपघात केला हे आम्ही सिद्ध करू शकतो. त्यासाठी बरेच पुरावे आमच्याकडे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयात ते पुरावे किती तग धरतात ते महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शहाची ओळख परेड शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात झाली. त्यावेळी साक्षीदाराने आरोपीला ओळखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.