भुयारी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन रखडले! 15 ऑगस्टची डेडलाईन हुकणार; गणेशोत्सवातील मुहूर्तासाठी धडपड

भुयारी मेट्रो-3 अर्थात अॅक्वा लाईनच्या बहुप्रतीक्षित तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाबाबत संभ्रम कायम आहे. वरळी ते कफ परेडपर्यंतचा टप्पा 15 ऑगस्टला खुला करण्याची डेडलाईन निश्चित केली होती. मात्र काळबादेवी परिसरातील दोन स्थानकांचे काम अद्याप सुरू असल्याने स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकणार आहे. मेट्रो प्रशासन आता गणेशोत्सवातील मुहूर्तावर मेट्रोचा तिसरा टप्पा खुला करण्याचा प्रयत्न करणार आहे.

भुयारी मेट्रो-3 मार्गावर आरे जेव्हीएलआर ते वरळी आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत सध्या मेट्रोची सेवा सुरू आहे. त्यापुढील वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेड हा 9.1 किमीचा भुयारी मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वरळीतील दोन स्थानकांत पाणी साचले होते. त्यावरून एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर भुयारी मेट्रोचा तिसरा टप्पा खुला करण्याआधी प्रशासन पुरेशी खबरदारी घेत असल्याचे सूत्रांकडून समजते. प्रशासनाने स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कफ परेडपर्यंतचा टप्पा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.