>>चंद्रसेन टिळेकर
या सदरातून गेले काही दिवस मी सातत्याने बुवाबाजीचे दळण दळतोय याची मला कल्पना आहे. परंतु आपले प्रश्न आपण न सोडविता दुसऱ्या कोणावर तरी सोपवायचे ही जी प्रवृत्ती आपल्या समाजात गेल्या शतकापासून वाढीस लागली आहे ती पुलंच्या शब्दांत सांगायचे तर सर्वसामान्यांचा बौद्धिक आळस वाढवणारी तर आहेच, पण माणुसकीलाही काळिमा फासणारी आहे. कारण बुवा, बापू, स्वामी, महाराज यांना आपले सर्वस्व अर्पण केल्याशिवाय भक्तांना चैन पडत नाही आणि या भक्त समूहात स्त्रिया अधिक संख्येने असतात हे आणखी एक कटू सत्य!
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियात एक व्हिडीओ पाहिला त्यामध्ये काही भक्त आपल्या ‘बापू’नामक गुरूचे पाय धुऊन त्या पायाचे चक्क चुंबन घेत होते. हे माणुसकीला काळिमा आणणारे नाही काय? अर्थात हे काही आजचे नाही. पेशवाईच्या काळातही घरी आलेल्या ब्राह्मणांचे पाय धुऊन ते पाणी तीर्थ म्हणून बहुजन मंडळी ते भक्तिभावाने पिऊन टाकीत. खरे तर केवढी देदीप्यमान अशी संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. कुणाही संताने माणूसपणाची विटंबना व्हावी अशी पायधुणी भक्ती महाराष्ट्राला शिकवलेली नाही. पण आम्ही त्यांच्यापासून काही शिकलो का? याबद्दल शंका येते. अन्यथा जे एक बापू आज खून व बलात्काराच्या गुह्याखाली तुरुंगात आहेत, त्यांच्या नावाने दरवर्षी आम्ही दिंडी काढून ती पंढरपूरला नेली नसती. तसेच आमच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी सत्य साईबाबाला सरकारी बंगल्यावर बोलावून त्याचे पाय धुतले नसते आणि ते पाणी सर्व बंगल्यावर शिंपडले नसते. तसेच दुसरे एक माजी मुख्यमंत्री जाहीरपणे मुक्ताफळे उधळतात की, राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते. त्यांना अर्थातच युरोपीय रेनेसान्सची माहिती नसावी की, जिथे धर्मसत्ता उखडून टाकली गेल्यामुळेच वैज्ञानिक क्रांती झाली आणि त्या जोरावर युरोपातल्या छोटय़ा-मोठय़ा देशांनी जगभर राज्य केले. टीचभर इंग्लंडने आमच्या खंडप्राय अशा हिंदुस्थान देशावर दीडशे वर्षे राज्य केले हेही विसरता येणार नाही. (पण आमच्याकडे मात्र पाठय़पुस्तकात धर्मग्रंथांची शिकवण समाविष्ट करून आम्ही गंगा उलटी कशी वाहील या प्रयत्नात आहोत.)
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर धर्माच्या आडोशाने हे ढोंगी, बाबा, बुवा, बापू भाबडय़ा जनांची पूर्वी फसवणूक करायचे त्याला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीने’ महत्प्रयासाने जो ‘अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी’ कायदा महाराष्ट्रात करून घेतला. त्यामुळे त्याला चांगलाच चाप बसला आहे. देशभर हा कायदा व्हावा म्हणून ही समिती प्रयत्नशील आहे. भोलेबाबाच्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, भोलेबाबावर मनुष्यवधाचा खटला भरावा अशीही मागणी या समितीने केली आहे.
निर्बुद्ध भक्तीचे जे थैमान आपल्या देशात सुरू झाले आहे त्यावर काही मंडळी उपाय सुचवतात तो म्हणजे निरीश्वरवादाची कास धरण्याचा. कदाचित या साऱयाचा उबग आल्यानेच डॉ. श्रीराम लागूंसारखी मंडळी ‘परमेश्वराला रिटायर’ करण्याचा उपाय सुचवित असावीत. तो अर्थातच फारसा चुकीचा आहे असेही नाही. कारण पृथ्वीतलावरील काही राष्ट्रांतील जनता जेव्हापासून संख्येने अधिकतर निरीश्वरवादी म्हणजेच नास्तिक झाली तेव्हापासून त्या राष्ट्रांचा विकास झपाटय़ाने झाल्याचा यासंदर्भात जे अहवाल प्रसिद्ध होतात त्यावरून आपल्या लक्षात येते. परंतु आम्हा हिंदुस्थानींचा मोठा असा ग्रह आहे की, ‘विज्ञानात जरी आम्ही मागासलेले असलो तरी अध्यात्मात पुढारलेले आहोत आणि सर्व जग आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमच्याकडे आशेने पाहत आहे.’ आता हे सत्य आहे की, स्वप्नरंजनाच्या डोही डुंबविणारी अंधश्रद्धा याचे उत्तर ज्याचे त्याने आपल्या विवेकवादाच्या आधारेच शोधावे हे उत्तम!
त्याचे उत्तर काहीही असले तरी आपण सगळ्यांनी मनाशी एक खूणगाठ नक्कीच बांधली पाहिजे आणि ती म्हणजे आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. दुसरी कुठलीही पारलौकिक, अलौकिक दैवी शक्ती सोडवू शकणार तर नाहीच, पण होऊन गेलेले आणि इहलोकी ठाण मांडून बसलेले बाबा, बुवा, स्वामी हे तर नाहीच नाही. आता हे मीच काय कोणीही कितीही पोटतिडकीने सांगितले तरी हे पालथ्या घडय़ावर पाणी ओतण्यासारखे आहे असे वाटू लागले आहे. याचे कारण म्हणजे पुरोगामी समजल्या जाणाऱया या महाराष्ट्रात आमच्या नावाजलेल्या मराठी कलावंतांनी गेल्या काही दिवसांपासून आपापल्या महाराजाने, बुवाने, स्वामीने आपल्याला संकटातून कसे वाचवले याच्या कहाण्या निरनिराळ्या वाहिन्यांवरून सांगायला सुरुवात केली आहे. रोज कोणी ना कोणी नामवंत कलावंत कुठल्या ना कुठल्या चॅनेलवरून चमत्काराचा हा रतीब घालीत असतो. या कलावंतांवर जनता मोठय़ा संख्येने प्रेम करीत असल्याने मोठे अविचारी वादळ घोंगावू लागले आहे. अशा वादळी परिस्थितीत विवेकी विचारांचे बीज या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्र भूमीत पेरायचे तरी कसे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
[email protected] (लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)