WWE सुपरस्टार हल्क होगन यांचे निधन, फ्रिस्टाईल कुस्तीला जगभरात ग्लॅमर मिळवून देणारा पैलवान काळाच्या पडद्याआड

कुस्तीची आणि फ्रीस्टाईल हाणामारी पाहण्याची आवड असणाऱ्या WWE चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. 90 च्या दशकात आपल्या खेळाने कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या WWE सुपरस्टार हल्क होगन यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 71 व्या वर्षी हल्क होगन यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुस्ती जगतावर शोककळा पसरली आहे.

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी फ्लोरिडा राज्यातील क्लियरवॉटर येथील राहत्या घरात हल्क होगन यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर वैद्यकीय मदतीसाठी तत्काळ डॉक्टराना पाचारण करण्यात आले.

पोलिसांच्या गाड्या आणि आपत्कालीन वैद्यकीय पथक त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर होगन यांना तातडीने स्ट्रेचरवर टाकून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर्स त्यांना वाचवू शकले नाहीत. कार्डियक अरेस्टमुळे (हृदयविकाराचा तीव्र झटका) त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हल्क होगन हे कुस्ती जगतातील सर्वात लोकप्रिय आणि सुपरस्टारपैकी होते. त्यांच्या नावावर WWE मध्ये अनेक विक्रम आणि अविस्मरणीय विजयांची नोंद आहेत. पिळदार शरीर, पिवळ्या आणि लाल रंगाचे कपडे आणि ‘Say your prayers, eat your vitamins’ या घोषणेमुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने अवघ्या कुस्तीविश्वावर आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.