यशस्वी ‘मुंबईकर’ झाला, एमसीएने नाहरकरत प्रमाणपत्र मागे घेतले

तीन महिन्यांपूर्वी गोव्याकडून खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट सोडणाऱया यशस्वी जैसवालला पुन्हा मुंबईकडून खेळायला मिळणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यशस्वीच्या विनंतीला मान्य करण्यात आले असून त्याला दुसऱया राज्याकडून खेळण्यासाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे यशस्वी पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसेल.

गेल्या आठवडय़ात पृथ्वी शॉने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला पुनरुज्जीवन देण्यासाठी मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाच यशस्वी जैसवाल पुन्हा मुंबईकर होण्याचे संकेत मिळाले होते. आज एमसीएच्या अॅपेक्स काQसिलच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबई संघातील एका वरिष्ठ खेळाडूशी कथित खटके उडाल्याच्या वृत्तामुळे यशस्वी जैसवालने रागाच्या भरात मुंबई सोडून गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला गोव्याचे कर्णधारपदही देण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र जैसवालने गोवेकर होताच पुन्हा आपण मुंबईकडूनच खेळू इच्छितो, असे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्याची विनंती केली होती. एमसीएने गेले तीन महिने या पत्राचे जैसवालला कोणतेही उत्तर दिले नव्हते. अखेर आज झालेल्या बैठकीत त्याचे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यात आल्याचे सांगितले. यशस्वी हा मुंबईचा अभिमान आहे. त्यामुळे तो आगामी मोसमात मुंबईसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.

दिव्यांग क्रिकेटपटूंच्या मदतीला एमसीए

दिव्यांग क्रिकेटपटूंना मदतीचा हात देण्याचा निर्णय एमसीएने घेतला असून त्यांनी त्यांच्यासाठी नवी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएच्या या निर्णयामुळे मुंबईत असलेल्या शेकडो दिव्यांग क्रिकेटपटूंना आधार लाभला आहे. सध्या मुंबईत दिव्यांग क्रिकेटपटूंचीही संघटना अस्तित्वात आहे. मात्र या संघटनेला फारसे आर्थिक सहकार्य लाभत नसल्यामुळे त्यांच्या मोजक्याच स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. माजी कसोटीपटू अजित वाडेकर यांचेही दिव्यांग क्रिकेटपटूंना मोलाचे सहकार्य लाभले होते.