यात्री ऍपवरून दिसणार प्रवाशांचे लाईव्ह लोकेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने अलीकडेच सुरू केलेल्या यात्री ऍपवर नवीन अनोखी सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना यात्री ऍपवरून आपले लाईव्ह लोकेशनही नातेवाईकांना शेअर करता येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरी पोहचण्यास उशीर झाल्यास नातेवाईकांना प्रवाशांचे नेमके लोकेशन कळू शकणार आहे.

लोकलचे वेळापत्रक आणि लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेने अलीकडेच यात्री ऍप विकसित केले आहे. त्यावर केवळ लोकलचे वेळापत्रक, लोकल कुठपर्यंत आली, लोकल उशिराने धावत आहे का आदी माहिती मिळत होती. 13 जुलै 2022 पासून मध्य रेल्वेने यात्री ऍपवर आपले लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची  सुविधा उपलब्ध केली आहे. रात्रीच्या वेळी उशीर झाल्यास आपल्या कुटुंबीयांना आपले लोकेशन कळवता येणार आहे.