येरवडा पोलिसांनी चोरट्याकडून केली कार, दुचाकी जप्त

पुणे शहर परिसरात वाहनचोरी करणार्‍या आरोपीला येरवडा पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून एक चोरीची कार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

टारझनसिंग चंदासिंग भोंड (24, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. येरवडा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान एकजण संशयीतरित्या दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती अंमलदार संदीप जायभाय, सागर दळवी व दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून भोंड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याची दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वडगावशेरी भागातून आणखी एक कार चोरल्याचे कबूल केले.

त्याच्याकडून एक कार आणि दुचाकी असा 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार तुषार खराडे, किरण घुटे, वैâलास डुकरे, सुरज ओंबासे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.