
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
३७ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेला आज १३ ऑक्टोबर रोजी मलकापूर येथे प्रारंभ झाला असून ही राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा ३ दिवस ठेवण्यात आली असून या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.
बृहन महाराष्ट्र योग परिषद अंतर्गत ३७ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूर व बुलढाणा जिल्हा योगा असोसिएशनच्या वतीने मलकापूर येथे १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येत आहे. आज सकाळी सहभागी झालेल्या स्पर्धेतील खेळाडुंची शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन चैनसुख संचेती यांनी केले. तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.अरूण खोडसकर, टी.ए. सोर, सतीष मोहगावकर, जयंत राजूरकर, विरसिंग राजपूत, हरिभाऊ गोसावी, बाळासाहेब जगताप, अतुल होले यांचेसह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्थानिक महेश भवन येथे ३ दिवस ही राज्यस्तरीय योगासन अजिंक्य स्पर्धा होत असून या स्पर्धेचा समारोप १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार असून यावेळी दामोधर लख्खानी, डॉ.केशवराव क्षीरसागर, सन्मती जैन, अजयसिंग राजपूत, राजेश बनकर, शशिकांत येवतकर, दादाराव पाटील, हरीभाऊ पाटील, अशोकसेठ राजदेव, नितीन पवार, मनोज पाटील, सागर कुटे, सतीष दांडगे आदींची उपस्थिती लाभणार आहे. आजपासून सुरू झालेल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडुंकडून लक्षवेधक प्रात्यक्षिके सादर करण्यात येवून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
































































