उत्तम झोप हवीये? रात्रीच्या जेवणानंतर करा ही योगासने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी आहार आणि व्यायामासोबत उत्तम झोप घेणं ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे.
सध्याच्या घडीला अनेक लोकांना आवश्यक प्रमाणात झोप मिळत नाही. कधी हेवी डिनर, कधी तणाव तर काही अन्य कारणामुळे अनेकांवर रात्रभर एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर होण्याची वेळ येते. परिणामी दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. जर ही गोष्ट सातत्याने होत असेल तर याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण निद्रानाश समस्येची ही सुरुवात असू शकते. मोठ्या समस्येला सामोरे जाण्याआधी जीवन शैलीत काही महत्त्वाचा बदल करुन तुम्ही यावर उपाय करु शकता. रात्री उशीरापर्यंत फोनमध्ये डोकावण्याची सवय असेल तर ती बंद करा. झोपेच्या औषधांचा वापर करण्यापेक्षा योगासन हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.
योगासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्येवर समाधान मिळू शकते. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही काही योगासने केली तर तुम्हाला उत्तम झोप निश्चित मिळू शकते.

रात्रीच्या जेवणानंतर पचन क्रिया उत्तम होण्यासाठी तुम्ही वज्रासन योगासनाचा सराव करु शकता. या आसनाच्या नियमित सरावाने गॅस आणि अ‍ॅसिडिटी या समस्या दूर करण्यास मदत मिळते. परिणामी तुम्हाला उत्तम झोप मिळू शकते. रात्रीचे जेवण केल्यानंतर 15-20 मिनटांनी तुम्ही हे योगासन करु शकता. पाय वाकवा आणि गुडघ्यावर बसा. तुमच्या पायांचे पंजे उलट्या स्थितीत मागे खेचा.
पाय एकत्रीत जोडा आणि पायाचे अंगठे एकमेकांवर क्रॉस करून ठेवा.
तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, पाठीचा कणा ताठ, डोके सरळ आणि तुमची नजर एकदम समोर ठेवा.
तुमच्या श्वासांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना श्वासांवर काळजीपुर्वक लक्ष ठेवा.
हे आसन सुरुवातीला किमान 5 मिनिटे करा. त्यानंतर तुम्ही वेळ वाढवून ती 10 मिनिटांपर्यंत नेऊ शकता. नियमित सरावानंतर तुम्ही हे आसन 30 मिनिटांपर्यंत करु शकता.

भद्रासन
रात्रीच्या जेवणानंतर 30-35 मिनटांनी तुम्ही भ्रदासन करु शकता. या आसनामुळे पचन शक्ती सुधारण्यास मदत मिळते. पोट हलके वाटते. त्यामुळे रात्री उत्तम झोप येण्यास मदत होते.
योगा मॅटवर पाठ सरळ करून बसा.
दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जोडा. हाताच्या माध्यमातून दोन्ही पायांना आधार द्या.
आता गुडघ्यांची हालचाल वर-खाली अशी करा.
ही हालचाल करत असताना कंबर सरळ आणि ताठ राहील याची काळजी घ्या.

योग निद्रा
योग निद्रा अभ्यास उत्तम झोप मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग मानला जातो. जर तुम्हाला रात्री झोपेची समस्या असेल तर जेवण आटोपल्यानंतर दो-तीन तासानंतर अंथरुणावर पडल्यावर तुम्ही 15-20 मिनिटे योग निद्रा योगासनाचा सराव करु शकता.
तुम्हाला फक्त शवासन स्थितीत झोपायचे आहे. या स्थितीत चार-पाच वेळा दिर्घ श्वास घ्या आणि शरीराला आरामदायी स्थितीत आणण्याचा प्रयत्न करा. या आसनाचा सराव केल्यावर तुमच्या मनात घोळणारे विचार गायब होतील. उत्तम झोप लागण्यास ते फायद्याचे ठरेल.