
सामना ऑनलाईन । लखनौ
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षाच्या उमेदवारावर टीका करताना ‘बाबर की औलाद’ असा शब्दप्रयोग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 72 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत विरोधकांवर टीका नाही तर भजन म्हणायचे का, असा सवाल केला आहे.
निवडणूक प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी ही होतच असते. विरोधकांवर प्रहार करणे राजकीय नेत्यांचे कामच असते. त्यामुळे निवडणूक काळात असे प्रकार सत्ताधारी आणि विरोधकांकडून होणारच. प्रचारसभांत टीका नाही करायची तर भजन म्हणायचे का, असा संताप योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. तसेच समाजवादी पक्ष, काँग्रेसचे नेते निवडणूक काळात शिव्या देत असतील तर आम्हालाही त्याचे वाईट वाटणार असे ते म्हणाले.
देशाचा पंतप्रधान बनण्यासाठी 272 जागा जिंकण्याची आवश्यकता असते. केवळ 37-38 जागा लढणारेही आज पंतप्रधान बनण्याची स्कप्ने पाहत आहेत. बसपा नेत्या मायावतींना भेटायला गेलेल्या अखिलेश यादव यांना मायावतींपेक्षा छोटी खुर्ची देण्यात आली यावरून त्यांची जागा काय हे दिसून येते, असा टोला त्यांनी लगावला.

























































