
अभिनेता कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान कमल हासन मात्र आता त्यांच्या विधानामुळे, अडचणीत आले आहेत. कमल हासन यांनी कन्नड भाषेचा जन्म “तमिळ भाषेतून झाला आहे” असे विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर आता कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे की, तुम्ही कमल हासन असाल पण लोकांच्या भावना दुखावू शकत नाही.
न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. राजकमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या वतीने याचिकाकर्त्याने हजेरी लावली आणि असा युक्तिवाद केला की, हे विधान वेगळ्या संदर्भात दिले गेले आहे. ते म्हणाले, “कृपया विधान कोणत्या संदर्भात केले गेले ते पहा. यावर न्यायालयाने म्हटले की, यात माफी नाही. तुम्ही कमल हासन असाल किंवा इतर कोणीही, तुम्ही जनतेच्या भावना दुखावू शकत नाही. हा देश भाषेच्या आधारावर विभागला गेला होता. कोणताही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती अशी विधाने करू शकत नाही. कर्नाटकच्या जनतेने फक्त तुमच्याकडून माफी मागितली आहे.
न्यायालयाने हसनच्या विधानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, तुम्ही कोणत्या आधारावर विधान दिले आहे, तुम्ही इतिहासकार आहात, भाषाशास्त्रज्ञ आहात का? तुम्ही हे विधान कोणत्या आधारावर केले? न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, 75 वर्षांपूर्वीही असेच विधान करण्यात आले होते आणि राजगोपाल यांनी त्यावेळी माफी मागितली होती. न्यायालयाने पुढे म्हटले की, जीभ घसरल्याने काहीही होऊ शकते. बोललेले शब्द परत घेता येत नाहीत पण माफी मागता येते.
कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे अभिनेते-राजकारणी कमल हासन यांना सांगितले की, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार इतक्या प्रमाणात दिला जाऊ शकत नाही की, त्यामुळे जनतेच्या भावना दुखावतील. खरं तर, या विधानानंतर कमल हासनचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपटही अडचणीत आला आहे.