
भटक्या श्वानांना पकडण्यासाठी 40 ते 50 जणांच्या हातातील काठ्या पाहून घाबरलेल्या तरूणाने इन्स्टाग्राम लाईव्ह सुरू केले. ते पाहून जमावाने त्याला हाताने मारहाण करीत मोबाइल हिसकावून घेतला. त्याशिवाय सोबतीच्या तरूणीला बेदम मारहाण करीत मोटारीचे नुकसान केल्याची घटना 11 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटी आवारात घडली.
काही दिवसांपूर्वी संबंधित सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाने चिमुरड्यावर हल्ला करीत लचके तोडले होते. त्यामुळेच जमावाकडून श्वानांची धरपकड केली जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीशा आणि त्यांचा मित्र मोटारीतून 11 फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत मैत्रीणीला भेटायला गेले होते. त्यावेळी 40 ते 50 जण भटक्या श्वानांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या हातामध्ये काठ्या असल्यामुळे कपिल घाबरून गेला.
त्याने मोबाइलमध्ये इन्स्टाग्रामद्वारे लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने कपीलला हाताने मारहाण करीत मोबाइल काढून घेतला. त्याशिवाय नितीशा यांना 10 महिलांनी बेदम मारहाण केली. मोटारीचे नुकसान केले आहे. स्वप्नील होळकर (वय 44), नितीन निगम (वय 40 ) यांच्यासह 10 महिलांविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतीशा सक्सेना (35) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.
























































