नारळ काढताना फांदी तुटल्याने युवक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडावरून नारळ काढताना फांदी तुटून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. रात्रभर शोध घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

प्रतीक लक्ष्मण भांडवले (वय 19) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

प्रतीक हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. सोमवारी रात्री मित्र विशाल सुतार याच्यासमवेत तो प्रमोद भिलारे यांच्या विहिरीजवळील नारळाच्या झाडावरचे नारळ काढण्यासाठी गेला होता. नारळ तोडत असताना त्याने फांदी पकडली होती. मात्र, ती फांदी अचानक तुटल्याने प्रतीकचा तोल गेला. तो थेट विहिरीच्या कठडय़ावर आदळल्यानंतर विहिरीत पडला. विशाल सुतार याने ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.

पोलीस पाटील शिवाजी सावंत यांनी पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीच्या पाण्यात प्रतीकचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेरीस भांडवले यांचे कोरेगावातील नातेवाईक चंद्रकांत सुतार यांनी मढपंप आणल्यानंतर विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास प्रतीकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ल्हासुर्णे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक रामचंद्र भांडवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सचिन साळुंखे तपास करीत आहेत.