युवा आमदारांची संगमनेरात टोलेबाजी

989

जातपात आणि धर्म याची कोणतीच बंधने न पाळता नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. लोकांच्या मनातले राज्य निर्माण करायचे आहे. एक सुसंस्कृत आणि संयमी पिढी घडवायची असून हे दशक राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे दशक असणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा युवा सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित राज्यातील 6 तरुण आमदारांच्या, मंत्र्यांच्या ‘संवाद तरुणाईशी’ या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी, ऋतुराज पाटील अशा या सहा तरुण आमदारांच्या एकत्रित मुलाखतीचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अमृतवाहिनीच्या विश्वस्त शरयू देशमुख तसेच डॉक्टर जयश्री थोरात, कांचन थोरात, राजवर्धन थोरात, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह विद्यार्थी व युवावर्ग प्रचंड प्रमाणात उपस्थित होता.

या मुलाखती प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतल्या. सुमारे दोन तास हा संवाद रंगला होता. अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या विविध तिरकस प्रश्नांना सर्वच युवा आमदारांनी दिलखुलास उत्तरे दिली.

माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री आणि दोन कॅबिनेट मंत्री

माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री, दोन कॅबिनेट मंत्री आणि ‘मातोश्री’ बंगलादेखील आहे. ते माझे सौभाग्य आहे. या मतदारसंघात काम करताना मला सर्वात जास्त निधी मिळेल आणि सर्वसामान्यांची कामे करता येतील, असा विश्वास आमदार झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केला. मुलाखतकार गुप्ते यांनी प्रेक्षकांना विचारले होते, सिद्दिकी यांचा मतदारसंघ कोणता आहे. प्रेक्षकांकडून आलेल्या उत्तरानंतर सिद्दिकी यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

संवाद ‘जादुई फोन’वरून

या कार्यक्रमात ‘जादुई फोन’ म्हणजे मोबाईलवरून हव्या त्या व्यक्तीशी काल्पनिक संवाद साधण्याचाही रंगतदार प्रयोग झाला. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कॉन्फरन्स कॉल करून संवाद साधला. ऋतुराज पाटील यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला. धीरज देशमुख यांनी अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलमध्ये खुद्द बच्चन यांना फोन करून हिंदीत संवाद साधला. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना कॉन्फरन्स कॉल केला. झिशान सिद्दिकी यांनी फोनवरून सलमान खानशी संवाद साधला तर रोहित पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधत मी रोहित पवार बोलतोय, नाव ऐकलं असेल, असे म्हणताच एकच हशा उडाला. जनतेची काळजी घ्यावी. शेतकऱयांच्या प्रश्नांत लक्ष घालावे. आता चारच वर्षे राहिली आहेत, असा संवाद साधला.

रॅपिड फायर-आदित्य ठाकरे यांना अवधूत गुप्ते यांनी विचारलेले प्रश्न…

आईची पसंती की स्वतःची?

अजून भरपूर काम करायचे आहे.

कोणते राजकीय व्यक्तिमत्त्व आवडते? फडणवीस की अजित पवार?

अजित पवार

सर्वांत जवळचे कोण, बाबा की आई?

आई-बाबा.

भाजपचे एकनाथ खडसे की पंकजा मुंडे, यांच्यापैकी जवळचे कोण?

महाविकास आघाडीला दोन्ही जवळचे.

अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली, तेव्हाचा धक्का मोठा होता की, संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा?

प्रत्येक घटनेकडे शांतपणे पाहून त्यावर संयमी प्रतिक्रिया देणाऱया उद्धव ठाकरे यांचा मी मुलगा आहे. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचा धक्का वगैरे बसत नाही. शिवाय आमची मैत्री पक्की असल्यामुळे धक्का बसण्याचे काही कारणच नव्हते. धक्का बसलेले विधान भवनात आमच्या समोर आहेत.

राज ठाकरे की नारायण राणे, यामध्ये कोणाचा राग येतो?

राजकीय क्षेत्रात कटुता बाळगायची नसते. राग मनात ठेवायचा नसतो. कोणाच्याही विषयी राग, द्वेष नाही. मनात राग ठेवला तर तो चेहऱयावर दिसतो. त्यामुळे आपले मन नेहमी साफ ठेवा, असे वडील सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या