आणखी एका सांगलीकर तरुणाची जुगाड चारचाकी; कुमार पाटील यांची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभवाचा वापर करत सांगली जिल्ह्यातील आणखी एका तरुणाने ‘जुगाड चारचाकी’ तयार केली आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीसाठी बनविलेली ही चारचाकी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ईश्वरपूरमधील कुमार पाटील यांनी वर्षभर मेहनत घेऊन दुचाकी इंजिनाचा वापर करून ही चारचाकी निर्माण केली आहे. या गाडीची नुकतीच अंतिम चाचणी घेण्यात आली असून एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर शेतातील कोळपणीचे काम करण्यात आले. या चारचाकीला 60 हजार रुपये खर्च आला असून कुमार यांच्या निर्मितीचे कौतुक होत आहे.

ईश्वरपूरमधील विष्णूनगर येथे कुमार पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. कुमार यांनी गेली वीस वर्षे व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून दिली आहेत. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का, या विचारातून त्यांना वर्षभरापूर्वी चारचाकी गाडीची कल्पना सुचली. दुचाकीचे 100 सीसी इंजिन वापरून त्यापासून चारचाकीची निर्मिती सुरू केली. लोखंडी साहित्यासह स्टिअरिंगऐवजी त्यांनी हॅण्डलचा वापर केला. गाडी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यालाही यश आले. इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गिअरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला. गाडीला शेतीची अवजारे कशी जोडता येतील, याबाबत शेतकरी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे बनवून घेतली. कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषधफवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने-आण करण्यासाठी सीटमागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे.

एक लिटरमध्ये एक एकर शेताची कोळपणी
कुमार पाटील यांनी नुकतीच विष्णूनगर येथील शेतकऱयाच्या शेतीमध्ये गाडीची चाचणी घेतली. यावेळी एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम करण्यात आले. अल्पवेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकऱयांसाठी ती वरदान ठरणार आहे.

सांगली जिह्यातील तिसरी ‘चारचाकी’
देवराष्ट्रे येथील फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रय लोहार यांनी भंगारातील साहित्य आणि दुचाकीचे इंजिन वापरून जुगाड जिप्सी तयार केली आहे. याची दखल आनंद महिंद्रा यांनीदेखील घेतली होती.

सांगली येथील एका सातवी शिक्षित अशोक आवटी या मेकॅनिकने अवघ्या 30 हजार रुपयांत फोर्ड कार 1930ची प्रतिकृती बनविलेली आहे. ती एम-80पासून बनविलेली जुगाड गाडी आहे.

ईश्वरपूरमधील कुमार पाटील यांनी एक वर्षाची मेहनत व सुमारे 60 हजार रुपये खर्चून शेतकऱयांसाठी उपयुक्त ठरणारी जुगाड चारचाकी बनविली आहे. यासाठी दुचाकीचे इंजिन वापरण्यात आले आहे.