
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण झाल्याचे आरोप करत 26 वर्षीय इंजिनीयरने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद आज उमटले. या घटनेनंतर मंगळवारी केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरएसएसच्या विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. मृत इंजिनीयर आनंदू अजि याला न्याय देण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. संघ की शाखा या बलात्कार के अड्डे? आरएसएस म्हणजे राष्ट्रीय शोषण मंच असे लिहिलेले फलक हाती घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी आरएसएसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरएसएसच्या शाखांमध्ये तरुण मुलांवर बलात्कार होतात. ही कसली संस्कृती आहे? यापेक्षा भयंकर काहीच असू शकत नाही. संघ स्वयंसेवकांपासून मुलांना वाचवा, असे आवाहन उदय चिब यांनी यावेळी केले.
कर्नाटकमध्येही निदर्शने
कर्नाटकातही काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे उग्र निदर्शने करत तरुणांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.
एफआयआरमध्ये आरएसएसचा उल्लेख का नाही?
आनंदु अजि याच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरएसएसचा उल्लेख नसल्याबद्दल काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावरून काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. ‘आनंदुने त्याच्या पोस्टमध्ये अनेक वेळा आरएसएसचा उल्लेख केला आहे. मात्र, एफआयआरमध्ये एकदाही संघाचे नाव नाही. हा कसला दहशतवाद आहे? एफआयआरमध्ये नावच नसेल तर निष्पक्ष चौकशी कशी होणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे.