तीक्ष्ण हत्याराचा वार करून तरुणाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, लातूर

तीक्ष्ण हत्याराचा वार करून युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना बाभळगाव शिरसी रोडवर घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खून प्रकरणी बालाजी ज्ञानोबा जाधव यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 13 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. 12 एप्रिल रोजी फिर्यादीचा मुलगा आकाश जाधव हा रात्री 8 वाजता बाभळगाव येथील प्रथमेश हॉटेल येथे दूध घेऊन येण्यासाठी गावातून मोटारसायकलवरून गेला होता. रात्री 9 वाजून गेले तरी तो परत आला नाही, तो मोबाईलही उचलत नव्हतात म्हणून फिर्यादी आणि त्यांचा दुसरा मुलगा विकास हे लुनावरून शिरसी येथून बाभळगावकडे निघाले.

थडकर यांच्या शेताजवळ त्यांचा मुलगा आकाश याची मोटारसायकल पडलेली दिसली. लुनाच्या आणि मोबाईलच्या लाईटमध्ये पाहिले असता रोडच्या पश्चिम बाजूला आकाश उताणा पडलेला दिसून आला. तो हालचाल करीत नसल्याने त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराचा वार केलेला दिसून आला. तो मृत झाल्याचे लक्षात येताच तिथून नातेवाईकांना, बाभळगाव येथील पोलीस पाटील यांना कळवले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत आकाश याचे डीएड पर्यंत शिक्षण झालेले होते. वडिलांच्या दुग्ध व्यवसायात तो मदत करीत असे.