
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरातील धुरीवाडा कन्याशाळा नजीक वास्तव्यास असलेल्या हनुमंत गंगाराम मालवणकर (४२) या तरुणाने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त मिळताच मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. हनुमंत यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
धुरीवाडा कन्याशाळेनजीक राहणारे हनुमंत मालवणकर हे उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून परिसरात ओळखले जायचे. गवंडीकाम करून ते उदरनिर्वाह करत असत. दुपारी अडीच वाजेपर्यंत ते शेजार्यांसोबत बोलले असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांचे काही मित्र त्याला बोलविण्यासाठी गेले असता त्यांनी राहत्या खोलीत नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी हा प्रकार त्याच्या नातेवाइकांना सांगताच त्यांनी तेथे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहर प्रमुख बाबी जोगी, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, दीपा शिंदे, नगरसेवक यतीन खोत, यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तसेच मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली.
वडिलांचे निधन काही दिवसापूर्वी झाले असताना हनुमंत याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्यामागे आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, श्री. शिवगण, सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.




























































