मुंबई विद्यापीठात जीएसटी अभ्यासक्रम सुरू करा! युवासेनेची मागणी

सामना ऑनलाईन । मुंबई

देशात जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा एकच कर लागू करण्यात आला आहे. जीएसटी विषयातील रोजगाराच्या संधी बघता हा विषय मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठात जीएसटी कोर्स सुरू करण्यासंदर्भात सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेतली. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, डॉ. सुप्रिया करंडे, राजन कोळंबेकर, ऍड. वैभव थोरात, धनराज कोचहाडे, युवासेनेचे साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.

महाविद्यालयीन तरुणांना जीएसटी विषयाचे पूर्ण ज्ञान देऊन देशात मोठय़ा प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणून पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ‘सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन गुडस् ऍण्ड सर्व्हिस टॅक्स-थिअरी ऍण्ड प्रॅक्टिकल’ या जीएसटी संदर्भातील अल्पमुदतीचा सर्टिफिकेट कोर्स आपण सुरू करावा, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.

मोठय़ा व्यावसायिकांपासून लहान-मोठे लघुउद्योग, दुकानदार, व्यावसायिक जीएसटीअंतर्गत येत असून त्यांच्यामध्ये जीएसटीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कित्येक लहान व्यावसायिकांना जीएसटीचे पूर्ण ज्ञान नसल्याने सीएवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जीएसटी भरून देणाऱ्या किंवा या विषयाची संपूर्ण माहिती असणाऱ्या तरुणांची मागणी आज वाढली आहे, याकडे सिनेट सदस्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधत हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या