
युवासेनेच्या दणक्यामुळे टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना अखेर हॉलतिकीट मिळाल्याने परीक्षा देता आली. युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळावे यासाठी विद्यापीठात ठिय्या मांडला होता.
टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी होती. यातील अनेक विद्यार्थ्यांना 13 ऑक्टोबरपर्यंत हॉलतिकीट मिळाले नव्हते. याबाबत युवासेनेकडे विद्यार्थी-पालकांनी तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी परीक्षा संचालक डॉ. रोंधळे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्याची मागणी करण्यात आली. हॉलतिकीट मिळेपर्यंत विद्यार्थ्यांसह याच ठिकाणी ठाण मांडणार असल्याचा इशारा देण्यात आला. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाकडून सायंकाळी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. यावेळी युवासेना सिनेट सदस्य धनराज कोहचाडे, परम यादव, किसन सावंत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.