
अकरावीची केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरळीत व्हावी याकरिता तांत्रिक दोष पूर्णपणे दूर करून अकरावीचे पोर्टल पूर्णपणे कार्यक्षम झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रियेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करू नये, अशी मागणी युवासेनेने शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
यंदा प्रथमच संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन (कॅप) पद्धतीने करण्यात येत आहेत. परंतु पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. यात विद्यार्थी पालकांना मोठा मनस्ताप झाला. विद्यार्थी व पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल शेठ देवरुखकर, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
संगणक प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रियेचा सुधारित कार्यक्रम जाहीर करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर प्रत्येक विभागावर सरकारने दोन संगणकतज्ञांची नेमणूक केली असून ही प्रणाली सुरळीत सुरू होऊन प्रवेश कोणत्याही अडथळ्याविना होतील, असे आश्वासन संगवे यांनी दिले.