युवासेना वरळी आयोजित ‘घमासान टी-20’ आज, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी युवासेना, वरळी शाखेने शनिवार, 25 जानेवारीला एनएससीआय क्लबच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये युवकांच्या ‘घमासान टी-20’ टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी युवासेनेने या आगळ्या झटपट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरळीत केले आहे. विभागातील नामवंत क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने युवासेना वरळी शाखा 2020 मध्ये वरळीत 2020 झाडांचे वाटप नागरिकांना करण्याचे संकल्प करणार आहे.

‘घमासान टी-20’ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी आमदार सुनील शिंदे, माजी राज्यमंत्री सचिन अहिर हे मान्यवर उपस्थिती राहणार आहेत. तसेच विभागातील नगरसेवक व शिवसेना पदाधिकारीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती युवासेना उप विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या