भरदुपारी सावली साथ सोडणार; मुंबईत 16 मे रोजी शून्य सावली दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असं म्हणतात. पण वर्षातील दोन दिवस असे असतात की ज्या दिवशी भरदुपारी काही क्षण आपली सावली आपली साथ सोडून देते. यालाच शून्य सावली दिवस असे म्हणतात. मुंबई आणि ठाण्यात येत्या 16 मे रोजी हा दिवस अनुभवता येणार आहे. मुंबईत सूर्य डोक्यावर येण्याची वेळ दुपारी 12 वाजून 35 मिनिटांची आहे. त्या वेळी आपली सावली गायब होईल.

शून्य सावली दिवसाविषयी अधिक माहिती देताना दा.कृ. सोमण म्हणाले, ‘‘वर्षातील दोन दिवस आपल्या स्थळाचे रेखांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात आपल्या डोक्यावर आल्याने आपली सावली नेमकी आपल्या पायाशी येते,  त्यामुळे ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपली सावली लुप्त होते. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने शून्य सावली अनुभवता येते. पण जुलै महिन्यात पावसामुळे ढगाळ वातावरण असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही, असे सोमण म्हणाले.

झिरो शॅडो कधी

  • रत्नागिरीत 11 मे रोजी, सातारा 12 मे, धाराशीव 13 मे, रायगड-पुणे-लातूर 14 मे, अंबेजोगई-केज 15 मे.
  • मुंबई, नगर, परभणी, नांदेड येथे 16 मे रोजी. ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण पैठण येथे 17 मे रोजी.
  • संभाजीनगर, जालना, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ येथे 21 मे रोजी, वर्धा 22 मे रोजी. धुळे, अकोला, अमरावती 23 मे. भुसावळ, जळगाव, नागपूर येथे 24 मे. नंदुरबार येथे 25 मे रोजी शून्य सावलीचा योग आहे.