
दिव्यांग विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या महिनाभरात जिल्हाभरातील अपंग कर्मचाऱयांच्या केलेल्या पडताळणीत जिह्यात 550 अपंग कर्मचारी आढळून आले. यापैकी 289 कर्मचाऱयांचे अपंगत्व हे डोळ्यांनी दिसत असून, उर्वरित 254 कर्मचाऱयांच्या अपंगत्वाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला खात्री होत नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱयांच्या अपंगत्व, अंपगत्व प्रमाणपत्र (युडीआयडी) नंबर याची आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिह्यात सापडलेल्या 550 कर्मचाऱयांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱया दिव्यांग अधिकारी व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचे युडीआयडी कार्ड तसेच या कर्मचाऱयांनी सेवेसह अन्य योजनांचा घेतलेला लाभ, याबाबत राज्य दिव्यांग विभागाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी झाल्या. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांच्या सर्व कर्मचाऱयांपैकी दिव्यांग कर्मचारी व त्यांचे प्रमाणपत्र (युडीआयडी) याची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी महिन्यापूर्वी दिले होते.
या आदेशानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचारी व त्यांच्या प्रमाणपत्रांसह युडीआयडीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ऍक्शन प्लॅन तयार केला आणि अपंग प्रमाणपत्र सादर केलेल्या सर्व कर्मचाऱयांचे अपंग कोठय़ातून विविध सवलती घेतलेल्या कर्मचाऱयांची पडताळणी केली. यात जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणारे 550 कर्मचारी अपंग असल्याचे समोर आले. यातील 289 कर्मचाऱयांचे अपंगत्व हे प्रथमदर्शनी डोळ्यांनी दिसत आहे. मात्र, 254 कर्मचाऱयांच्या अपंगत्वाबाबत प्रशासनाला शंका आहे. यात कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि 40 टक्क्यांपेक्षा जादा अस्थिव्यंग असणाऱया कर्मचाऱयांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱयांची यादी जिल्हा परिषद प्रशासन पडताळणीसाठी आरोग्य उपसंचालक यांना पाठवणार आहे. यात हे अपंगत्व बनावट आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येऊन त्याचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तपासणीला 12 कर्मचाऱयांची दांडी
n अहिल्यानगर जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या अपंग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेत 12 कर्मचाऱयांनी तपासणीला दांडी मारली, तर 81 कर्मचाऱयांचे अपंग प्रमाणपत्र (युडीआयडी) क्रमांक नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन या कर्मचाऱयांचे युडीआडी नंबर काढणार असून, तो नसल्यास संबंधित अपंग प्रमाणपत्र हे बनावट ठरणार आहे.
एकूण कर्मचारी, कंसात तपासणी होणारे
n अकोले 47 (13), संगमनेर 50 (33), राहाता 14 (1), श्रीरामपूर 14 (5), नेवासा 46 (28), राहुरी 28 (10), नगर 87 (47), श्रीगोंदा 39 (13), कोपगरगाव 14 (7), पारनेर 55 (21), कर्जत 39 (19), जामखेड 19 (13), पाथर्डी 47 (25), शेवगाव 36 (13), नगर मुख्यालय 15 (6) एकूण 550 (254) असे आहेत.
अपंग गुरुजींची तपासणी सुरू
n गेल्या काही महिन्यांपासून जिह्यातील काही शिक्षकांनी बदलीत लाभ घेण्यासाठी आजारपणासह विविध आजारपणाची कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतलेला आहे. अशा सर्व शिक्षकांची प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू असताना, आता पुन्हा दिव्यांग आयुक्त मुंडे यांच्या आदेशाची भर पडली.



























































