झोंबी बॉयने केली आत्महत्या, लेडी गागाने मानसिक रुग्णाचा कलंक पुसण्याचे केले आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ओटावा

झोंबी बॉय म्हणून ओळखला जाणारा कॅनेडियन कलाकार रिक जेनेस्ट याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. स्थानिक पोलिसांनी रिडियो कॅनडाला ही माहिती दिली. रिकने आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात टॅटू काढले होते. त्यामुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले होते. रिकची मैत्रीण आणि पॉप स्टार लेडी गागा हिने रिकच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर करताना म्हटले की “मानसिक आरोग्य आणि मानसिक रुग्णाचा कलंक पुसण्यासाठी आम्ही एकत्र काम केले.”

रिकने लेडी गागाच्या ‘बॉर्न दिस वे’ या गाण्यात काम केले होते. रिकने आपल्या शरीरावर मानवी सांगाड्याचे टॅटू काढले होते. त्याचा टॅटूचा विक्रम गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंदवला गेला.

लेडी गागाने रिकला ट्विटरवर श्रद्धांजली देताना म्हटले की “वैज्ञानिकदृष्ट्या एक सवय निर्माण व्हायला २१ दिवस लागतात, जर तुम्हला मानसिक आजाराने ग्रासले आहे, तर त्यातून बाहेर पडा आणि अजून कोणी या आजाराने ग्रासले असेल त्यांनाही या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.”