
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून आता प्रचाराला केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी गावागावात जाऊन बैठका, रॅली काढतानाच मतदारांच्या डोअर टू डोअर गाठीभेटींवर भर दिला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७६ उमेदवार रिंगणात आहेत तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ३२९ उमेदवार रिंगणात आहेत. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहीर होणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चौक जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या वैशाली खैर, चौक पंचायत समितीच्या कमल भस्मा व लक्ष्मण वाघमारे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील घोसाळे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार संचिता फुलारे व पंचायत समितीचे उमेदवार सचिन फुलारे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे. डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. विजयाचा कौल मिळून मशालच धगधगेल असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत. यावेळी तालुका संपर्कप्रमुख शैलेश फुलारे, प्रमोद कासकर, नंदू शिंदे, रणजित कदम, अनिल माळी, नितीन कांबळे, दिनेश बने, तुकाराम गांगल, मनोज तांडेल, हृतिक भगत, प्रथमेश सावंत, जयेश पाटील उपस्थित होते.






























































