
होळीचा सण आणि धुळवड साजरी करण्यासाठी मुंबईकर आणि ठाणेकरांनी आपल्या मूळ गावी भुर्रर्र केल्यामुळे आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
होळी आणि धुळवड हे दोन्ही सण साप्ताहिक सुट्टीला जोडून आले आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱया पर्यटकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी आणि आज मोठी वाहतूककोंडी झाली. अनेक चाकरमानी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करून कोल्हापूरमार्गे कोकणात जातात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून एक्सप्रेस वेवरही वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चाकरमानी आणि पर्यटक यांचे अतोनात हाल झाले.
























































