पैसे चोरल्याच्या संशयावरून बापाने दोन मुलींना रात्रभर उलटे टांगले, पाण्याने तडफडत एकीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेजारच्या घरातून पैसे चोरल्याच्या संशयावरून बापानेच पोटच्या दोन मुलींना पत्र्याच्या घरातील लोखंडी अँगलला तब्बल बारा तास उलटे टांगले. यात रात्रभर पाणी पाणी करत तडफडून एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी अत्यवस्थ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलींच्या बापाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात ही अमानुष घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नाना ऊर्फ दादू यमगर असे आरोपी बापाचे नाव आहे. या घटनेत सानिका ऊर्फ अतुजा (9) या मुलीचा मृत्यू झाला, तर अनुजा (11) ही अत्यवस्थ आहे. यमगर याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने या मुलींनी त्यांच्या घरात चोरी केल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे संतापाच्या भरात नाना यमगर याने अनुजा व सानिका यांना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले.

रात्रभर या मुली वेदनेने विव्हळत ‘पाणी पाणी’ अशी याचना करीत होत्या. त्यांच्या आक्रोशाने आई-वडिलांच्या हृदयाला मात्र पाझर फुटला नाही. उलट त्या निष्पाप मुलींना तसेच ठेवून आई-वडील निर्धास्त झोपले होते, तर आजी-आजोबा बाहेर झोपले होते. दरम्यान, रात्रभराच्या या अमानुष छळामुळे पाण्याविना तडफडत सानिकाने अखेर प्राण सोडले.