
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
कामाच्या नियोजनाचा अभाव असला की कामामधील अडचणीत वाढ निश्चितच होणार. अर्थात कामाचा उरक एका बाजूला आणि कामात केलेली चालढकल एका बाजूला. कामात चालढकल करणं हा स्वभावातील दोषापेक्षा मानसिक दोष असू शकतो असा विचार करून त्याबद्दल स्वत:त बदल केला तर तो नक्कीच पोषक ठरेल नाही का…
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा वाक्प्रचार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. याचा सरळसाधा अर्थ हा की, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. काही व्यक्ती या शांत स्वभावाच्या असतात तर काही बोलक्या. काही मुळातच स्वभावाने गंभीर असतात, तर काही त्यांच्या अगदी विरुद्ध… एकदम विनोदी! काही या अतिशय संयमी असतात तर काही उथळ स्वभावाच्या. अशी ही विविध तऱहेची स्वभाववैशिष्टय़े असलेली माणसं आपल्याला आजूबाजूला म्हणजे अगदी आपल्या घरातही सापडतात. अशी ही वेगवेगळी स्वभाववैशिष्टय़े असलेली माणसं! जितक्या यांच्या प्रवृत्ती असतात तितकेच त्यांचे काही गुणविशेषही असतात आणि हीच त्यांची गुणवैशिष्टय़े त्यांचे स्वभावधर्म बनत जातात. त्यांची ओळख बनून राहतात. म्हणूनच ‘चिडकू’, ‘आळशी’ किंवा ‘शांत’ अशी बिरुदावली ही त्या त्या व्यक्तींची खास ओळख बनून जाते.
निमाची (नाव बदलले आहे) अशीच एक ओळख होती… चिडकू. ती कुठल्याही नोकरीत खूश नव्हती. नोकरीला लागून पंधरा दिवस झाले रे झाले की तिच्या स्वतःच्या कामाबद्दल, ऑफिस कलीग्स, बॉसबद्दल तक्रारी सुरू व्हायच्या. घरीही तिची काही वेगळी परिस्थिती नव्हती. घरातील प्रत्येक छोटीमोठी गोष्ट, अगदी किचन आणि बाकी खोल्यांमधली सगळी कपडय़ा-भांडय़ांची व्यवस्था, सजावट ही तिचीच होती. पण दोन ते तीन दिवसांतच ती ते बघून नाखूश व्हायची. मग पुन्हा त्या सगळ्या गोष्टी ती लावत, उपसत बसायची.
निमाच्या या अशा स्वभावामुळे नवरासुद्धा तिला घरी कुठलीही मदत करायला कंटाळायचा. कारण त्याच्याही काम करण्याच्या पद्धतीबद्दल तिच्या तक्रारी सुरू व्हायच्या. ती पूर्णपणे असमाधानी होती.
तिच्या असमाधानी असण्याचं एक कारण होतं ‘तिची घाईघाईत निर्णय घेऊन कसलाही मागचापुढचा विचार न करता तो अमलात आणण्याची वृत्ती.’ त्यामुळे तिला जर का कुठल्याही गोष्टी तिच्या मनासारख्या झाल्या नाहीत तर प्रचंड राग यायचा. चिडचिड सुरू व्हायची आणि ही चिडचिड नोकरीचा राजीनामा तसंच घरात नवऱयावर राग काढण्यात व्यक्त व्हायची. हे सर्व निमाला हळूहळू असह्य व्हायला लागलेलं. कारण तिच्या हातात आता नोकरीही नव्हती ना घरी शांतता. कुठेतरी चुकतंय ही जाणीवच तिला समुपदेशनासाठी घेऊन आली होती.
निमाशी बोलताना अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ‘तिचा चालढकल करण्याचा स्वभाव.’ कुठलंही काम करताना तिला भयंकर टेन्शन यायचं. त्यामुळे ‘मला नाही जमणार… नंतर बघेन’ या विचाराने ती ऑफिसची कामं किंवा घरातली कामं करताना चालढकल करायची. मग जेव्हा तिच्या कामांचा पसारा वाढत जायचा तेव्हा तो ताण तिला असह्य व्हायचा आणि तो ताण चिडचिडेपणाचे रूप घेऊन दुसऱयांवर निघायचा. तिचे नुकसान मग ठरलेले असायचे. नोकरीचा राजीनामा हा तयार असायचाच. घरी असल्यावरसुद्धा ‘पूर्ण दिवस आहे… नंतर करू काम’ या सबबीखाली तिची कामं रेंगाळायची. मग तिला सर्व एकत्र करणं शक्य व्हायचं नाही. रात्री नवरा घरी आल्यावर मग ‘मी का करू तू का नाही?’ या बाचाबाचीत त्याच्याशी संवाद व्हायचा.
तर असा सर्वसाधारण निमाचा स्वभाव होता. आपल्या आजूबाजूला किंवा घरात अशी निमासारखी लोकं हमखास पहायला मिळतात. चालढकल करत कामं करणं आणि मग deadline आल्यावर घिसाडघाईत कामाचा सोक्षमोक्ष लावून टाकणं या दोन्ही परस्परांविरोधी स्वभावांमुळे ही माणसं मग चिडचिडी आणि चिरचिरी होतात. ‘कायम तक्रारी करणं’ या त्यांच्या सवयीमुळे ती कोणालाही नकोशी होऊन जातात.
पण ही नकोशी असणारी लोकं, मनाने तर वाईट नसतात. मग नेमकं यांचं चुकतं कुठे?
‘चालढकल करणं’ किंवा ‘घिसाडघाईत निर्णय घेणं’ या स्वभावाच्या मुळाशी ‘कुठल्याही नवीन गोष्टीची जबाबदारी स्वीकारण्याची भीती वाटणं’ ही भावना असते. ही भावना ‘मी कदाचित सक्षम नाही’ या काहीशा अयोग्य अशा विचारातून जन्म घेते. मग कुठलीही गोष्ट करताना ती अवघड वाटायला लागते. त्यातूनच ‘ते काम नंतर करू’ असा (बहुतेकदा बचावात्मक) विचार चालढकल किंवा येणारं काम दुसऱयावर टाकण्याची सवय लावतो. पण जर शेवटी आपल्यालाच जर काम करायचं असेल तर एकदम गळ्याशी आल्यानंतर ते कसंतरी उरकलं जातं.
आपलीही कधीतरी निमासारखी गत होऊ शकते. आपण जर काही कारणाशिवाय कामात चालढकल करत असू तर त्यासाठी काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. त्याची कारणं शोधली पाहिजेत. या सवयीविषयी सर्वप्रथम गैरसमज मनातून काढून टाकले पाहिजेत.
चालढकल करणाऱया व्यक्तींविषयी काही गैरसमज आहेत.
z चालढकल करणारी व्यक्ती आळशी असते – नाही. याउलट ती तिच्यावर होणाऱया टीकेवर अतिशय संवेदनशील असते. आपल्याकडून भयंकर गुन्हा घडलाय की काय, या समजातून ती गोष्टी पुढे ढकलते.
z चालढकल करणारी व्यक्ती ही बेजबाबदार असते – मुळीच नाही. उलट अशी व्यक्ती कुठल्याही परिणामांना घाबरत असते. मनात असूनदेखील त्यामुळे या व्यक्ती कुठलीही गोष्ट तत्परतेने करू शकत नाहीत.
z व्यक्ती मुद्दामहून चालढकल करते – असं नाही. अशा व्यक्तींना मुळातच आत्मविश्वास कमी असतो, पण तो आहे असं दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात त्या न करण्याची कारणं देत बसतात.
z चालढकल करणारी व्यक्ती आयुष्याबद्दल नीरस असते – अजिबात नाही. अशी व्यक्ती उलट आयुष्यातील प्रत्येक लहानसहान गोष्ट अतिशय गंभीरपणे घेत असते.
यामुळेच अशा व्यक्ती या अतिविचाराच्या दुष्टचक्रात अडकतात आणि नकारात्मक होत जातात. आयुष्याचा आनंद मनात असूनदेखील घेऊ शकत नाहीत.
या सवयीबद्दल एकदा का हे गैरसमज दूर झाले की त्यावर काम करायला सोप्पं होतं.
ओ मला नेमकी कशाची भीती अथवा दडपण वाटतं आहे?
ओ माझ्याकडून चालढकल ही कायम सगळ्याच बाबतीत होते आहे की कुठल्यातरी विशिष्ट बाबतीत जास्त होते आहे?
ओ जर गोष्ट किंवा काम नाही होऊ शकलं किंवा चुकीचं झालं तर त्याच्या परिणामांना मी तोंड नाही देऊ शकेन का?
या आणि अशा प्रकारच्या मनात येणाऱया प्रश्नांना ‘प्रामाणिक’पणे सामोरं जाणं महत्त्वाचं असतं. यातून जे आपल्याला गवसतं त्याचं समाधान आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास देऊन जातं. कारण आपण आपल्या ‘मनाला निर्भीडपणे सामोरे जात असतो’.
एकदा का ही सवय लागली की कुठलंही काम हे सहज सुकर होऊन जातं. म्हणूनच चालढकलीच्या सवयीला बदलण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्यात, जसं की –
1. आलेल्या कामाची छोटय़ा भागांत विभागणी करणं 2. प्रत्येक भागासाठी वेळेचं नियोजन करणं 3. एक बॅकअप प्लॅन तयार करणं 4. गरज भासल्यास दुसऱयांची मदत घेणं
निमाला हे समजवायला जरा वेळ लागला खरा. पण, ‘देर आये दुरुस्त आये’ या न्यायाने तिला गोष्टी हळूहळू समजत गेल्या. आता तिचा चिडकू स्वभाव बराच कमी झालेला आहे. कारण ती आता काही गोष्टींची जबाबदारी स्वतःच घ्यायला शिकली आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)






























































