
मार्लेश्वर हे केवळ श्रद्धास्थान नसून निसर्ग पर्यटणाचे मोठे केंद्र आहे.येथील भक्त आणि पर्यटकांची संख्या पाहता त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात हाच आमचा मानस आहे .१० कोटींची कामे वेगाने सुरु असून ३० कोटींच्या दुसरया टप्प्यामुळे मार्लेश्वर पर्यटनाचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास आमदार श्री शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे.
कोकणातील उपज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणारया श्री क्षेञ मार्लेश्वर तीर्थ क्षेञाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी शासन स्तरावरुन सुमारे ४० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करुन घेतला आहे .यातील पहिल्या टप्प्यातील १० कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पुढील ३० कोटींच्या कामांचा प्रस्ताव राज्यशासना कडे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे येत्या काळात श्री क्षेञ मार्लेश्वर हे राज्यातील एक अतिशय आकर्षक आणि सोयी सुविधायुक्त पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येणार आहे .
पहिल्या टप्प्यात १० कोटींच्या निधीतून भाविकांच्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यामध्ये १ कोटी ८७ लाखांची विविध कामे , मार्लेश्वर मंदिर परिसरातील पाखाड्या बांधणे , ५०० मीटरचा पालखी मार्ग ( मारळ ते मार्लेश्वर ) सुधारणे , पोलीस चौकी आणि तात्पुरते आरोग्यकेंद्र उभारणे , धबधब्याकडे जाणारया नदीवर ३० मीटर लांबीचा नवा पुल उभारण्यासाठी ३ कोटींचा निधी खर्च होत आहे. मंदिर परिसरातील सभामंडप आणि दत्तमंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. उर्वरित ५ कोटींतून प्रशस्त पार्कींग , सुसज्ज विक्री स्टॉल , गॅलरी , कॉंक्रीटच्या पाखाड्या आणि २ भक्कम संरक्षण भिंतींचे काम केले जाणार आहे .
आमदार शेखर निकम यांनी मार्लेश्वरच्या पुढील विकासासाठी ३० कोटी रुपयांचा नविन आराखडा तयार केला आहे. त्यासाठी विशेष सल्लागाराची नेमणूकही करण्यात आली आहे. ९०० मीटर लांबीच्या पायरी मार्गाचे रुंदीकरण करुन तो अधिक सुटसुटीत केला जाईल. वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी ‘ रोपवे ‘ उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.



























































