
गोडावूनमधून एक लाखाच्या इलेक्ट्रिक साहित्याची चोरी केल्याप्रकरणी तीन कामगारांसह चोरीचा माल विकत घेणाऱयांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिनाथ येवले (रा. निमगाव निपाणी, ता. नेवासा), बाळू निमसे (रा. वाकळी, ता. नगर), शुभम आरडे (रा. कामठी, ता. श्रीगोंदा), अक्षय ससे (रा. दरेवाडी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रदीप देविचंद नहार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नहार यांचे प्रदीप इलेक्ट्रिकल्स नावाचे आशा टॉकिजजवळ दुकान आहे. दुकानात जागा कमी असल्याने दुकानातील माल सहकार सभागृह रस्त्यावरील गोडावूनमध्ये ठेवला जातो. 15 नोव्हेंबर रोजी तपासणी केली असता, काही माल कमी असल्याचे जाणवले. त्यामुळे संशय आल्याने लक्ष ठेवले.
दुकानातील कामगार आदिनाथ येवले याला गोडावून येथून माल आणण्यास पाठवून नहार यांनी त्याच्या पाठीमागे जात लक्ष ठेवले. त्यावेळी दुचाकीवरून आलेला एकजण येवले याला भेटला. यानंतर नहार यांनी माल तपासला असता, 75 हजार रुपये किमतीचे 1 एमएम वायरचे अँकर कंपनीचे 6 बंडल, 25 हजारांचे अडीच एमएम वायरचे 10 बंडल असा एकूण 1 लाखाचा माल मिळून आला नाही. येवले, निमसे, आरडे यांनी सदर अक्षय ससे याला विकल्याचे नहार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

























































