
उदगीर व देवणी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर येथे शनिवारी महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत केली.
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेले हत्तीबेट हे भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेले पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीबेटास 10 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते विकास योजनेच्या नकाशावरून गायब करण्यात आलेल्या हत्तीबेटाच्या रस्त्यासाठी 20 लाख रुपये व हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर सहलीला आलेल्या लहान मुलांच्या मनोरंजनांच्या साधनांसाठी 15 लाखांचा निधी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजूर करून दिल्यामुळे या कामांचे कार्यारंभ आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
हणमंतवाडी-हत्तीबेट-ममदापूर हा 4 कि.मी. चा रस्ता 1981 ते 2001 या रस्ते विकास योजनेत असताना या रस्त्यावर जि.प.(बांधकाम)व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन वेळा डांबरीकरण झाले होते. हा रस्ता दोन राज्यमार्ग, दोन प्रमुख जिल्हा मार्ग, चार इतर ग्रामीण मार्ग व हत्तीबेट पर्यटन स्थळास जोडण्यात आलेला असताना व या मार्गावरून रोज 20 बसेस धावत असताना हा रस्ता 2001 ते 2021 च्या रस्ते विकास योजनेत समाविष्ट न करता या रस्त्याला नकाशावरून गायब करण्यात आले आहे. ही बाब हत्तीबेटावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. शिवाय हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी गेल्या 6 वर्षापासून निधी मिळाला नसल्याच्या तक्रारी पालकमंत्र्याकडे गेल्या होत्या. या तक्रारीची पालकमंत्री निलंगेकर यांनी हत्तीबेट रस्त्यासाठी २० लाख व मुलांच्या खेळणीसाठी 15 लाख रुपये असा एकूण 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.























































