
जीवनावश्यक वस्तू व सेवांवरील अनुदानात कपात करण्याच्या विरोधात पाकव्याप्त कश्मीरमध्ये जनक्षोभ उसळला आहे. ‘पीओके’तील अनेक शहरांत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. आंदोलकांनी पाकिस्तानी सैन्याच्या 25 जवानांना ओलीस ठेवले आहे. आंदोलना दरम्यान सैन्याकडून झालेल्या गोळीबारात गेल्या चार दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100हून अधिक जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार मूलभूत अधिकारही हिरावून घेत आहे, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. याविरोधात मोर्चा काढण्यात आला असून हजारोंच्या संख्येने लोक पीओकेची राजधानी मुझफ्फराबादच्या दिशेने निघाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे 38 मागण्या केल्या आहेत. महागाईतून दिलासा द्या, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.
ओलीस जवानांचा ढालीसारखा वापर
सरकारने आंदोलन मोडून काढण्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी सैनिकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आंदोलकांनी सैनिकांनाही लक्ष्य केले आहे. जवानांना ओलीस ठेवून त्यांना पोलिसांच्या समोर ढाल म्हणून पुढे केले जात आहे. त्यामुळे जमावाला नियंत्रित करणे सुरक्षा दलांसाठी कठीण होऊन बसले आहे.