महावितरणाचा ‘शॉकिंग’ कारभार; शून्य रुपये बिलावर १० रुपये दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सांगली

महावितणाच्या भोंगळ कारभाराच्या अनेक घटना नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र एका घटनेने महावितरणाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सांगलीत महावितरणाने एका उपभोक्त्याला शून्य रुपये बिल पाठवलं आहे. शून्य रुपये बिल पाठवलं ही समस्या नाही, मात्र शून्य रुपये बिल न भरल्यास या उपभोक्त्याकडून १० रुपये दंड आकारला जाणार आहे. आता या उपभोक्त्यासमोर हे शून्य रुपये बिल कसं भरावं असा प्रश्न उभा ठाकला आहे.

सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे राहणाऱ्या राहुल महावीर वारद यांचा रांगोली पॅकिंगचा व्यवसाय आहे. राहुल यांना मे महिन्याचं विजेचं बिल पाहून मोठा धक्का बसला. विजेच बिल शून्य रुपये होतं, मात्र ते ठऱाविक तारखेपर्यंत नाही भरलं तर त्यावर १० रुपयांचा दंड आकारला जाईल असं बिलात नमूद केलं होतं. महावितरणाच्या बिलाचं गणित सोडवण्य़ासाठी राहुल यांनी थेट महावितरणाचं कार्यालय गाठलं आणि याबाबत चौकशी केली. त्यावर राहुल यांनी अॅडव्हान्स पैसे जमा केल्याने शून्य रुपये बिल आल्याच महावितरणाच्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले. मात्र १० रुपये दंड का? याबाबतचं उत्तर राहुल यांना मिळालं नाही.