अर्थसंकल्पाबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अर्थसंकल्पातच रेल्वेचे बजेट देखील सादर होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आज अर्थमंत्री पियूष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी शेकडो अधिकारी जवळपास पाच सहा महिन्याआधीपासून काम करत असतात. अर्थसंकल्पाबाबत अशाच काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

1) अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्याच्या प्रती कुठेही लिक होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केलेली असते. अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आणतानाही सोबत लष्कराची सुरक्षा, डॉग स्क्वॉड असतो. 1950 साली अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच लिक झाला होता. तेव्हापासून अर्थसंकल्पाला कडक सुरक्षा पुरविण्यात येते

2) अर्थसंकल्पाचे काम हे पाच ते सहा महिने आधीपासून सुरू होते. 2017 पर्यंत बजेट हे फेब्रुवारी महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सादर केले जायचे. मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्यास सुरुवात केली.

3) अर्थसंकल्पासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत दिल्लीच्या उत्तर ब्लॉकमध्ये ठेवण्यात येते. त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता येत नाही किंवा फोनही करता येत नाही. त्यांना देण्यात येणारे जेवणही आधी चाखले जाते नंतरच त्यांना वाढण्यात येते. त्या कर्मचाऱ्यांसोबत एक डॉक्टरही कायम सोबत असतो. जर त्यांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडावे लागले तर गुप्तचर यंत्रणांची माणसं त्यांच्यासोबत असतात.

4) 2001 सालाच्या आधीपर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जायजा. मात्र 2001 सालचे तत्कालिन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्पाची वेळ बदलून सकाळी 11 वाजताची केली होती. तेव्हापासून अर्थसंकल्प 11 वाजताच सादर होतो.

5) अर्थसंकल्पाचे भाषण हे साधारणत: एक तास चालते. आतापर्यंत सर्वात मोठे भाषण माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 18650 शब्दांचे केले आहे. त्याखालोखाल अरुण जेटली यांनी 18604 शब्दांचे भाषण केले होते. तर सर्वात लहान भाषण हे 1977 चे अर्थमंत्री एच.एम पटेल यांनी अवघ्या 800 शब्दांचे केले होते.

6) अर्थसंकल्प छापायला सुरुवात करण्याआधी अर्थमंत्रालयातील प्रेसमध्ये हलवा बनविण्याचा कार्यक्रम केला जातो. त्यावेळी अर्थमंत्र्यांच्या हस्ते अर्थसंकल्पासाठी काम करणाऱ्या शेकडो अधिकाऱ्यांना मिठाई वाटली जाते.

7) अर्थसंकल्प सादर करण्याआधी प्रत्येकमंत्री अर्थसंकल्पाची बॅग हातात घेऊन संसदेबाहेर फोटो काढतो. तसा प्रोटोकॉलच आहे. या बॅगावरून देखील मोठी चर्चा होते. यशवंत सिन्हा यांनी वापरलेली करड्या रंगाच्या बकल स्ट्रॅप बॅगची खूप चर्चा झाली होती.

8) अर्थसंकल्प सादर करताना आतापर्यंत सर्वच अर्थमंत्र्यांनी कवितांचे आधार घेतले आहेत. त्यामुळे आता ती एक परंपराच बनत चालली आहे.