उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यायात्रेत सहभागी होणार दहा हजार क्षत्रिय तरुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज श्रीवास्तव, अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित दौऱ्याचे स्वागत केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात दहा हजार क्षत्रिय तरुण सहभागी होतील अशी घोषणाच महासभेने केली आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नुकतीच अयोध्येला जाऊन तेथील संत-महंतांची भेट घेतली. त्याप्रसंगी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष कुंवर अवनीश सिंह यांनी शिवसेनेने रामजन्मभूमीवर राममंदिर निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच क्षत्रिय समाजही शिवसेनेसोबत या कार्यात उतरेल असे सांगितले. राजकारण्यांनी राममंदिरापेक्षा सत्तेला प्राधान्य दिले नसते तर आपल्याला मंदिरनिर्मितीची प्रतीक्षा करावी लागली नसती, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

अयोध्येतील राममंदिर हा 2019 च्या निवडणुकीचा मुद्दा बनू नये असे शिवसेनेने सरकारला ठामपणे बजावल्यामुळेच क्षत्रिय महासभेने शिवसेनेच्या या मोहिमेला पाठिंबा दिला असे सिंह यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासोबत महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस कौशलेंद्र सिंह, भूपेंद्र प्रताप सिंह, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अखंड सिंह, राहुल सिंह, दिग्विजय सिंह, रवि सिंह, मनीष सिंह, राणा अजय सिंह आदी उपस्थित होते.